‘तुमको मेरी कसम’मध्ये अदा शर्मा
मुख्य भूमिकेत अनुपम खेर
विक्रम भट्टचा आगामी चित्रपट ‘तुमको मेरी कसम’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, अदा शर्मा, ईशा देओल आणि इश्वाक सिंह यासारखे प्रतिभावान कलाकार दिसून येणार आहेत. विक्रम भट्ट यांना हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जाते. परंतु यावेळी ते इंटेंस कोर्टरुम ड्रामा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
या चित्रपटाच्या 2 मिनिटे 51 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अनुपम खेर अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आले. त्यांच्यावर हत्येचा आरोप असून ते स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अदा शर्मा स्वत:च्या पतीचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या महिलेच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये ईशा देओल वकिलाच्या व्यक्तिरेखेत दिसून येते. चित्रपटाची कहाणी आयव्हीएफ सेंटरच्या अवतीभवती घुटमळणारी आहे.
अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 21 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांना याचा ट्रेल पसंत पडला असून त्यांच्याकडून त्याचे कौतुक केले जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, अदा शर्मासोबत इश्वाक सिंह, ईशा देओल, मेहरजान मज्दा आणि सुशांत सिंह देखील दिसून येणार आहे. अनुपम खेर यांची व्यक्तिरेखा यात मध्यवर्ती स्थानी आहे. हा चित्रपट डॉ. अजय मुर्डिया यांच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबत याची कहाणी लिहिली आहे.