हॉलिवूडमध्ये अभिनेत्रींना वाईट वागणूक
अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्टचा दावा
लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रिस्टन स्टीवर्टने हॉलिवूडवरून धक्कादायक खुलासा केला आहे. हॉलिवूडमध्ये अभिनेत्रींसोबत हातच्या बाहुल्यांप्रमाणे वर्तन केले जाते असे तिने सांगितले आहे. क्रिस्टन सध्या स्वत:चा चित्रपट ‘द क्रोनोलॉजी ऑफ वॉटर’मुळे चर्चेत असून याचे दिग्दर्शन तिनेच केले आहे. अभिनेत्रींना अत्यंत वाईटप्रकारे वागविले जाते. कुणीही अभिनेत्री होऊ शकते असे लोकांचे मानणे असते, परंतु जेव्हा मी पहिल्यांदा दिग्दर्शिका म्हणून स्वत:च्या चित्रपटाविषयी बोलण्यासाठी त्यांची भेट घेतली, तेव्हा आलेला अनुभव अत्यंत वेगळा होता असे तिने सांगितले आहे.
दिग्दर्शकाकडे अलौकिक क्षमता असते, खूप अधिकार असतात अशी धारणा आहे, परंतु हे सत्य नाही. ही धारणा पुरुषांद्वारे फैलावण्यात आलेली आहे. मी सदैव तक्रार करत राहते असे दाखवू इच्छित नाही, परंतु अभिनेत्रींसाठी स्थिती अभिनेत्यांपेक्षा खराब आहे. अभिनेत्रींना हातच्या बाहुल्यांप्रमाणे वागविले जात असते असा दावा तिने केला.
क्रिस्टन ही ‘ट्वाइलाइट’ चित्रपटांमुळे चर्चेत आली होती. आता ती स्वत:चा चित्रपट ‘द क्रोनोलॉजी ऑफ वॉटर’मुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 6 मिनिटांचे स्टँडिंग ओवेशनही मिळाले होते. क्रिस्टन या चित्रपटावर मागील 8 वर्षांपासून काम करत होती. क्रिस्टनची गणना जगातील सर्वाधिक मानधन स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींमध्ये होते. तिने एक ऑस्कर आणि सीझर अवॉर्ड पटकाविलेला आहे. सध्या 35 वर्षांची असलेल्या क्रिस्टनने स्वत:च्या अभिनयाची कारकीर्द वयाच्या 12 व्या वर्षी सुरू केली होती.