अभिनेत्री रान्या रावला सोने तस्करीप्रकरणी अटक
बेंगळूर विमानतळावर 14.8 किलो सोने जप्त : फ्लॅटवरील छाप्यातही आढळले सोने, 2.67 कोटींची रोकड
प्रतिनिधी/ बेंगळूर
डीजीपी दर्जाचे आयपीएस अधिकारी रामचंद्रराव यांची सावत्र मुलगी आणि अभिनेत्री असलेल्या रान्या राव हिला सोने तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दुबईवरून एमिरेट्स एअरलाईन विमानाने बेंगळूरच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या 32 वर्षीय रान्या राव हिची तपासणी केली असता 12.56 कोटी रुपये किमतीचे 14.8 किलो सोने आढळले. त्यामुळे महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी तिला अटक केली. त्यानंतर मंगळवारी रात्री बेंगळूरमधील लॅवेल्ली रोडवरील ‘नंदवाणी मॅन्शन’ या फ्लॅटवर छापा टाकून 2.06 कोटी रुपये किमतीचे सोने, 2.67 कोटींची रोकड असे एकूण 17.29 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाने दिली आहे.
कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी रामचंद्रराव हे पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक आहेत. त्यांची सावत्र मुलगी रान्या राव ही गेल्या 15 दिवसांत चार वेळा दुबईला गेली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संशय आल्याने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर करडी नजर ठेवली होती. दुबईवारी करून 2 मार्चला ती बेंगळूरला आल्यानंतर तपासणी केली असता 1 किलो वजनाची 14 सोन्याची बिस्किटे आढळली. तिने हे सोने कपड्यांमध्ये लपविले होते. दुबईवरून परत आल्यानंतर बेंगळूर विमानतळावर सीमाशुल्क अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून आपली तपासणी होऊ नये, यासाठी तिने सावत्र वडिलांच्या नावाचा दुरुपयोग केल्याचे समजते.
1962 च्या सीमाशुल्क कायद्यांतर्गत रान्या राव हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीकडील काळात बेंगळूर विमानतळावर डीआरआयने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. मंगळवार 4 मार्च रोजी तिला विशेष आर्थिक गुन्हे न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असता 18 मार्चपर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
पोलीस, उद्योजकांचे सहकार्य?
रान्या राव हिची कसून चौकशी केली जात आहे. वास्तव्यास असलेल्या लॅवेल्ली रोडवरील नंदवाणी मॅन्शन या फ्लॅटसाठी ती दरमहा 4.5 लाख रुपये भाडे देत होती. या फ्लॅटमधून डीआरआय अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचे सोने जप्त केले. तस्करी केलेले सोने वाहतुकीसाठी पोलीस आणि उद्योजकांनी सहकार्य केल्याचा संशय आहे. तिची एचआरबीआर लेआऊटमधील डीआरआय मुख्यालयात चौकशी केली जात आहे. सोने तस्करीत तिला सहकार्य केलेल्या इतर आरोपींविषयी माहिती गोळा केली जात आहे, असे सुत्रांकडून समजते.
माणिक्य चित्रपटामुळे चर्चेत
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘माणिक्य’ या कन्नड चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून रान्या राव हिने भूमिका केली होती. अभिनेता सुदीप याच्यासोबत तिने चित्रपटात अभिनय केला होता. त्यानंतर ती चर्चेत आली होती. त्यानंतर अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने केलेल्या भूमिकेचे सिनेरसिकांनी कौतुक केले होते. ती अभियांत्रिकी पदवीधर असून महाविद्यालयीन जीवनापासून चित्रपटसृष्टीची आवड होता. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला असून चिक्कमंगळूर येथे पतीसमवेत तिचे वास्तव्य आहे.
40 ग्रॅम सोने आणण्याची मुभा
दुबईहून भारतात येणाऱ्या पुरुषांना सीमाशुल्काशिवाय 20 ग्रॅम सोने आणण्याची मुभा आहे. तर महिला प्रवासांना कमाल 40 ग्रॅम सोने आणण्याची मुभा आहे. एखाद्या वेळेस पुरुष प्रवाशाने 20 ग्रॅमपेक्षा अधिक आणि 50 ग्रॅमपर्यंत सोने आणल्यास 3 टक्के सीमाशुल्क भरावे लागते. 50 टक्क्यांवरील सोन्यासाठी 6 टक्के, 100 ग्रॅमपेक्षा अधिक सोने आणले तर 10 टक्के सीमाशुल्क भरावे लागते. महिला प्रवाशांना 100 ग्रॅम सोन्यासाठी 3 टक्के, 100 ग्रॅमपेक्षा अधिक सोने आणल्यास 6 टक्के शुल्क भरावे लागते. शिवाय सोने व्यवहारासंबंधी कागदपत्रे, खरेदी, शुद्धतेचे प्रमाणपत्रही सादर करावे लागते.