हवालाच्या पैशांनी मी सोनं खरेदी केल्याची अभिनेत्री रान्या रावची कबुली
बेंगलुरू
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला काही दिवसांपूर्वी बंगळुरू विमानतळावर १४.८ किलो तस्करीच्या सोन्यासह अटक करण्यात आली होती. याप्रकरणी डीआरआयचे वकिल मधु राव यांनी सत्र न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रान्यारावने चौकशीदरम्यान कबुल केलं आहे की, सोनं खरेदी करण्यासाठीचे पैसे हवालाद्वारे पाठविण्यात आले होते.
अभिनेत्री रान्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान, डीआरआयचे वकिल मधु राव म्हणाले की, अधिकाऱ्यांनी अभिनेत्री रान्याविरुद्ध न्यायालयीन चौकशी सुरू करण्यासाठी कलम १०८ अंतर्गत नोटीस बजावली आहे. तसेच तिचा जामीन आत्तापर्यंत दोनवेळा फेटाळण्यात आलेला आहे. आधी कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्जाला नकार दिला होता, तर दुसऱ्यांदा आर्थिक गुन्ह्यांच्या विशे। न्यायलयानेही जामीन अर्ज फेटाळला आहे.
सत्र न्यायालयाने २७ मार्चपर्यंत आपला निकाल राखून ठेवला आहे. ३ मार्च रोजी रान्या रावच्या अटकेवेळी अधिकाऱ्यांनी तिच्याकडून १२.५६ कोटी रुपयांची सोन्याची बिस्कीटं जप्त केली होती. तसेच तिच्या घराची झडती घेतली होती. यामध्ये २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.
रान्याची ट्रॅव्हल हिस्ट्री..
अभिनेत्री रान्याची भारत ते दुबई ट्रॅव्हल हिस्ट्री धक्कादायक आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रान्या सोनं आणताना खास ड्रेस कोट करत असल्याची माहिती समोर आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) अभिनेत्रीच्या सोन्याच्या तस्करीच्या कारवाईची माहिती उघड करण्यासाठी तिच्या ट्रॅव्हल पॅटर्न बद्दल चौकशी करत आहेत. अभिनेत्री रान्याने भारतातील ज्या विमानतळांवरून प्रवास केला आहे, तेथील सर्व माहिती एकत्र करून चौकशी सुरु आहे. या तपासामध्ये समोर आलेल्या माहिती नुसार, २०२० पासून आत्तापर्यंत अभिनेत्री रान्याने ९० वेळा परदेशात प्रवास केला आहे. त्यापैकी बंगळुरू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ६० वेळा प्रवास केला आहे.