अभिनेता जिम कॅरी पुन्हा विवाहबंधनात
अमेरिकन अभिनेता जिम कॅरीने स्वत:ची प्रेयसी मिन आहसोबत विवाह केला आहे. 64 वर्षीय अभिनेता आणि त्याची 32 वर्षीय प्रेयसी मिनने जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह केला. हा सोहळा लॉस एंजिलिसमध्ये पार पडला आहे. फेब्रुवारी महिन्यात जिमने पॅरिस येथील एका सोहळ्यात स्वत:च्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्या सोहळ्यात जिमला मानद सीझर पुरस्कार प्राप्त झाला होता, ज्याला फ्रेंच ऑस्कर देखील म्हटले जाते.
हा पुरस्कार फ्रान्सच्या अकॅडमी डेस आर्ट्स अॅट टेक्निक्स डू सिनेमाच्या वतीने प्रदान केला जातो. जिम आणि मिन हे 2022 पासून एकत्र आहेत. परंतु त्यांना स्वत:च्या नात्याला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवले होते. जिमचा हा तिसरा विवाह आहे. यापूर्वी अभिनेत्याने अभिनेत्री मेलिसा वोमरसोबत संसार थाटला होता. त्यांनी 1987 साली विवाह केला होता. या दांपत्याला जेन एरिन कॅरी नावाची मुलगी आहे. तर जिम आणि मेलिसा यांनी 1995 साली घटस्फोट घेतला होता. त्यानंतर जिमने अभिनेत्री लॉरेन हॉलीसोबत सप्टेंबर 1996 साली विवाह केला होता. त्यांचा विवाह एक वर्षही टिकू शकला नव्हता. जून 1997 मध्ये दोघेही विभक्त झाले होते.
