अभिनेते दिगंबर नाईकांच्या एन्ट्रीने विद्यार्थ्यांना सुखद धक्का
असनियेच्या शिवछत्रपती विद्यालयाला दिली भेट
ओटवणे : प्रतिनिधी
प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांनी असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. दिगंबर नाईक यांच्या प्रशालेतील नकळत एंट्रीने विद्यार्थ्यांसह सर्वांनाच सुखद धक्का बसला. यावेळी दिगंबर नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खास मालवणी भाषेत घातलेले गाऱ्हाणे लक्षवेधी ठरले.स्व. मच्छिंद्र कांबळे यांनी अजरामर करुन ठेवलेली ' वस्त्रहरण' नाटकातील तात्यांची भुमिका तितक्याच समर्थपणे साकारून घराघरात पोचलेले, प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक एका मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने असनिये गावात आले होते.मराठी नाटक, मालिका, सिनेमा त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमातील स्किटमध्ये विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनेते दिगंबर नाईक यांच्याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्या सोबत फोटो व त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विशेष म्हणजे अभिनेते दिगंबर नाईक यांचा अनेक महोत्सवातून त्यांच्यातील अस्सल मालवणी कलावंत पहायला मिळतो. अभिनय करताना त्यांनी आपला मालवणी बाज कायम ठेवला. जिथे संधी मिळेल तिथे मालवणी भाषा आवर्जुन बोलायची, हा त्यांचा शिरस्ता आहे. "ईच्छा माझी पूरी करा', "भटाच्या साक्षीने', "अर्धी मस्ती अर्धा ढॉंग', "मिस्तर नामदेव म्हणे', "लाडीगोडी' यासारखी अनेक नाटके तर "गाव गाता गजाली', "फू बाई फू', "बिग बॉस' यासारखे अनेक रिआलीटी शो आणि अनेक चित्रपटांतून त्यांचा जो अभिनय असतो तोच याची डोही याची डोळा विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. यावेळी प्रशालेच्यावतीने अभिनेते दिगंबर नाईक यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.असनियेचा निसर्गरम्य परिसर पाहून बेहद्द खुश झाल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका जान्हवी सावंत , संजय सावंत, श्री. राठोड, श्री. देसाई व इतर कर्मचारी उपस्थित होते.