अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार
मुंबई
बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर झाली आहे. अखेर 11 दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी सकाळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. 1 नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने 89 वर्षीय धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या कठोर देखरेखीनंतर आता ते घरी परतले आहेत. धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घरी डॉक्टरांचे एक पथक पोहोचले आहे. त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांनी घरीच मिनी आयसीयू तयार केला असून, त्यांची सतत तपासणी केली जाईल.
धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी अॅम्ब्युलन्सद्वारे कडक सुरक्षा व्यवस्थेत घरी नेण्यात आले. आता त्यांना घरी पूर्ण आराम करण्याची आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याची सक्तीची सूचना डॉक्टरांनी दिली आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबातील सदस्य पत्नी हेमा मालिनी, मुले सनी देओल, बॉबी देओल, आणि ईशा देओल यांनी रुग्णालयात सतत उपस्थित राहून त्यांना आधार दिला.