For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खूनप्रकरणी अभिनेता दर्शनला अटक

06:22 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
खूनप्रकरणी अभिनेता दर्शनला अटक
Advertisement

अभिनेत्री पवित्रा गौडासह 13 जण गजाआड : 6 दिवसांची पोलीस कोठडी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

विवाहित युवकाच्या खूनप्रकरणी प्रसिद्ध कन्नड सिनेअभिनेता दर्शन, त्याची मैत्रिण अभिनेत्री पवित्रा गौडासह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. मेडिकल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या रेणुकास्वामी याच्या निर्घृण हत्या प्रकरणात दर्शन सहभागी असल्याचे प्राथमिक तपासातून उघड होताच बेंगळूरच्या कामाक्षीपाळ्या पोलिसांनी त्याला मंगळवारी म्हैसूरमध्ये अटक केली. सर्व 13 आरोपींना न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईमुळे सॅन्डलवूडमध्ये खळबळ माजली आहे.

Advertisement

चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी हा दर्शनची मैत्रिण पवित्रा गौडा हिला अश्लील मेसेज पाठवत असल्याच्या संतापातून खून करण्यात आला. दर्शनच्या समक्ष हे कृत्य घडल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. रेणुकास्वामीच्या खून प्रकरणी बेंगळूरच्या गिरीनगर येथील तिघांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्यांनी पैशांच्या वादातून हे कृत्य केल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांची कसून चौकशी केली, त्यावेळी आरोपींनी दर्शनचे नाव घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सायंकाळी दर्शनला बेंगळुरात आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याची सखोल चौकशी केली जात असल्याचे बेंगळूरचे पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी दिली.

या प्रकरणात चॅलेंजिंग स्टार अशी ओळख असणारा दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा, विनय व्ही., एम. लक्ष्मण, नागराजू आर., पवन के., प्रदोश एस., दीपककुमार एम., नंदीश, कार्तिक, निखिल नायक, केशवमूर्ती, राघवेंद्र उर्फ रघू या 13 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी बेंगळूर, म्हैसूर, मंड्या व चित्रदुर्ग येथील रहिवासी आहेत. दर्शनविरुद्ध सेक्शन 363 अंतर्गत अपहरण, 302 अंतर्गत जीवघेणा हल्ला, सेक्शन 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपावरून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर खुनाचा कट रचल्याच्या आरोपावरून पवित्रा गौडा हिला अटक करण्यात आली आहे.

घटनेविषयी अधिक माहिती अशी, चित्रदुर्ग येथील लक्ष्मीवेंकटेश्वर कॉलनीतील रहिवासी रेणुकास्वामी हा अपोलो मेडिकलमध्ये काम करत होता. दर्शनची मैत्रिण पवित्रा गौडा हिला अश्लील संदेश पाठवत होता, असे सांगण्यात आले आहे. याविषयी दर्शनच्या चाहत्यामार्फत दर्शनला ही बाब समजली. दरम्यान, 8 जून रोजी घरातून बाहेर पडलेला रेणुकास्वामी घरी परतला नाही. 9 जून रोजी त्याचा मृतदेह बेंगळूरमधील एका नाल्यात आढळून आला. तेथून नजीक असलेल्या अपार्टमेंटचा सिक्युरिटी गार्ड केवल राम दोरजी याने पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.

शेडमध्ये व्रूरपणे छळ करून खून

पवित्रा गौडाला आक्षेपार्ह संदेश पाठविणाऱ्या रेणुकास्वामी याला 8 जून रोजी चित्रदुर्गहून बेंगळूरला बोलावून कामाक्षीपाळ्या येथील विनय व्ही. याच्या शेडमध्ये बोलावून घेण्यात आले. 9 जून रोजी काही जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केल्याचे समजते. रेणुकास्वामीच्या डोक्यावर, छातीवर, गुप्तांगावर वार करण्यात आल्याचे आढळले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या अंगाला चटके देऊन व्रूरपणे छळ करण्यात आला. या घटनेत रेणुकास्वामीचा मृत्यू झाला. खुनानंतर नंतर रेणुकास्वामीचा मृतदेह कामाक्षीपाळ्या परिसरातील सुमनहळ्ळी येथील नाल्यात फेकून देण्यात आला. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही. नंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून माहिती मिळविली. चौघांना अटक केल्यानंतर दर्शनच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे आरोपींनी सांगितले. दरम्यान, हे कृत्य होत असताना दर्शनही तेथेच होता, अशी माहिती मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजवरून उपलब्ध झाली आहे.

रेणुकास्वामी दर्शनचा चाहता?

खून झालेला रेणुकास्वामी दर्शनचा कट्टर चाहता होता. दर्शन आणि विजयलक्ष्मी या दाम्पत्याच्या जीवनात दरी निर्माण होऊ नये, याचा विचार रेणुकास्वामीने केला.   मात्र, पवित्रा गौडा दर्शनच्या संसारात आडवी येत असल्याचा समज करून अश्लील संदेश पाठवत होता. पवित्राच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटोंवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता, असे सांगितले जात आहे.

यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात

अटकेत असणारा अभिनेता दर्शन ऑन स्क्रिन मास हिरो वाटत असला तरी तो अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला आहे. पत्नी विजयलक्ष्मी हिच्यावर 8 सप्टेंबर 2011 रोजी दर्शनने जीवघेणा हल्ला केला होता. पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तो 28 दिवस कारागृहात होता. नंतर तडजोडीने हे प्रकरण मिटविण्यात आले. 2012 मध्ये दर्शनचा ‘चिंगारी’ चित्रपट यशस्वी ठरला. याच दरम्यान त्याने चित्रपट निर्मात्याला फोन करून अर्वाच्च शब्दात अवमानीत केल्याचा आरोप आहे. अभिनेता सुदीप आणि दर्शन यांच्यातील मतभेद उघड असून ते एकमेकांवर उघडपणे टीका करत असतात. त्याचप्रमाणे म्हैसूरमधील एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण, चित्रपट निर्माते उमापती यांच्याशी मतभेद, अशा अनेक कारणांमुळे दर्शन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

कोट्स....

तपासातून अधिक माहिती समोर येईल!

रेणुकास्वामी याचा खून वैयक्तिक कारणावरून झाला की यामागे दुसरा हेतू आहे, याविषयी तपासातून माहिती समोर येईल. खून प्रकरणात दर्शनची भूमिका कोणती, याचा तपास केला जात आहे. आरोपींनी दर्शनचे नाव घेतल्याने दर्शनला अटक करण्यात आली आहे. प्रकरणात कोणाकोणाचा थेट सहभाग आहे, दर्शनचे नाव का समोर आले, याचा तपास पोलीस करत आहेत. यासंबंधी सध्या अधिक काही सांगता येणार नाही.

- डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री

Advertisement
Tags :

.