वडिलांना दारुची सवय होती ती मलाही...
'आप की अदालत'चे होस्ट रजत शर्मा यांच्याशी बोलताना बॉबीने कबूल केले की, या कठीण काळात त्याची पत्नी तान्या देओल त्याच्या पाठीशी उभी राहिली. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही हार मानता, तेव्हा तुम्ही स्वतःची कीव करू लागता. हा मानवी स्वभाव आहे.
बॉबी पुढे म्हणाला "तुम्हाला वाटतं की तुमचं जग संपलं आहे, कोणीही तुम्हाला पसंत करत नाही, आणि मग तुम्ही अशा काही गोष्टींच्या आहारी जाता ज्या तुम्हाला शांत ठेवण्यास मदत करतात. माझ्या वडिलांनाही दारू प्यायची आवड होती, आणि मी सुद्धा प्यायला सुरुवात केली आणि मला त्याचं व्यसन लागलं. पण माझ्या पत्नीने मला त्यातून बाहेर काढलं.
जर तानया माझ्या आयुष्यात नसती, तर मी आज इथे बसलो नसतो. तिने आमच्या घराची आर्थिक जबाबदारी सांभाळली. ती नोकरी करत होती आणि घरातील सर्व खर्च उचलत होती. जेव्हा माझी मुलं विचारू लागली की मी नेहमी घरी का बसून असतो आणि त्यांची आई ऑफिसला का जाते, तेव्हा माझ्या मनात काहीतरी तुटलं आणि मी स्वतःवर काम करायचं ठरवलं.”
माझी पत्नी मला कधी सोडून गेली नाही
बॉबीच्या कठीण काळात, तान्या त्याला सोडून जाईल अशा अफवा पसरल्या होत्या. बॉबीने यावर भाष्य करताना म्हटले, “हे ऐकून मला विनोद केल्यासारखं वाटतंय. स्त्रिया मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप कणखर असतात; माझ्या पत्नीने मला कधीच सोडले नाही. मी दारू पिणे सोडले नाही तर ती मला सोडून जाण्याची धमकी द्यायची, पण तिने कधीच तसे केले नाही आणि मी दारू पीत राहिलो. पण तसे कधीच घडले नाही.”
बॉबीने कबूल केले की त्यालाही ऑनलाइन शॉपिंगचे व्यसन होते आणि त्यासाठी त्याची पत्नी त्याला अनेकदा ओरडायची. त्याने सांगितले की, ती दुसऱ्या दिवशी बिले काढून त्याला दाखवायची, ज्यामुळे त्याला कळायचे की तो किती पैसे विनाकारण खर्च करत आहे. बॉबी त्याच्या आगामी अनुराग कश्यप दिग्दर्शित बंदर या चित्रपटात मुख्य भूमीकेत दिसणार आहे. त्याचे चाहते आतुरतेने त्याच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत.