अभिनेता अल्लू अर्जुनची चौकशी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संध्या चित्रपटगृह चेंगराचेंगरी प्रकरणी सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जून याची हैद्राबाद पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. अर्जून याच्या पुष्पा-2 या गाजलेल्या चित्रपटाच्या प्रथम शोचे आयोजन या चित्रपटगृहात करण्यात आले होते. त्यावेळी स्वत: अर्जुन हा शो पाहण्यासाठी उपस्थित होता. मात्र, त्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत एक महिला ठार तर दोन मुले जखमी झाली होती.
अर्जुन याच्यामुळे ही गर्दी आणि दुर्घटना झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे. अर्जून याने सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण चित्रपटगृहात येणार आहोत, ही माहिती चित्रपट गृहाच्या व्यवस्थापनाला पुरेशी आधी देण्यात आली होती. तसेच व्यवस्थापनानेही यासाठी प्रशासनाची अनुमती घेतली होती. ही दुर्घटना माझ्यामुळे नव्हे, तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडली आहे, असे प्रतिपादन अर्जुन याने केले होते. मात्र, हैद्राबाद पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून यासंदर्भात त्याची मंगळवारी पोलिसांकडून साधारणत: पावणेदोन तास चौकशी झाली.
चौकशीला सहकार्य
प्रशासनाला जी चौकशी करायची आहे, ती करण्यास आपला आक्षेप नाही. प्रशासनाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास आपण तयार आहोत. त्यामुळे जेव्हा चौकशीसाठी बोलाविले जाईल, तेव्हा आपण जाण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन अल्लू अर्जुन याने आधीच केले होते. त्यानुसार त्याने सहकार्य केले आहे, असे त्याच्या वतीने त्याच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले. यानंतर प्रशासन कोणती पावले उचलणार आहे, याकडे आता त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.