For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जॉर्डन ते ओमान : सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेणारी सक्रिय भागीदारी

06:42 AM Dec 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
जॉर्डन ते ओमान   सांस्कृतिक संबंध नव्या उंचीवर नेणारी सक्रिय भागीदारी
Advertisement

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच जॉर्डनसह इथिओपिया व ओमान या देशांचा महत्त्वाचा असा दौरा केला असून या तीनही देशांचे प्राचीन संबंध या नव्या भेटीने अधिक समृद्ध होणार आहेत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच फिन्टेक तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, औषध निर्माण क्षेत्र, कृषी, खते आणि ऊर्जा तसेच पायाभूत सुविधांचा विकास या क्षेत्रांतील संधींवर पंतप्रधानांनी विशेष प्रकाश टाकला. दोन्ही बाजूंनी विविध व्यवसायांतील सक्रिय भागीदारी शोधण्याचा आणि विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला.

Advertisement

डिसेंबर महिना हा सण, समारंभ आणि उत्सवांचा महिना असतो. जगभर नाताळचा सणही याच महिन्यात साजरा होतो. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अलीकडेच जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या देशांचा दौरा केला. या तीनही देशांशी भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. या सांस्कृतिक संबंधांना नवी ऊर्जा देऊन या संबंधांना नव्या उंचीवर नेणारी सक्रिय द्वीपक्षीय भागीदारी या दौऱ्यातून प्रकट झाली आहे. या तीनही देशांच्या दौऱ्याची फलश्रुती प्रस्तुत लेखात मांडली आहे. दौऱ्याच्या निमित्ताने राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांचे एक नवे पर्व उदयास आले आहे. जार्डन ते ओमान हा सांस्कृतिक संबंधांचे पुनरुज्जीवन करणारा मैत्रीचा शिवदीप सदैव नवा प्रकाश देत राहील.

खत निर्मितीला चालना

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॉर्डन दौऱ्यामुळे उभय राष्ट्रातील प्राचीन सांस्कृतिक संबंधांना एक नवा उजाळा मिळाला आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी केलेल्या चर्चेतून मौलिक फलनिष्पत्ती झाली आहे. सध्याचे राजे हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे 41 वे वंशज मानले जातात आणि ते जेरुसलेम येथील इस्लाम धर्माच्या जगातील तिसऱ्या पवित्र स्थानाचे संरक्षक आहेत. भारत आणि जॉर्डन यांच्यातील प्राचीन संबंधांना या भेटीमुळे नवा उजाळा मिळाला आहे. या भेटीदरम्यान पाच सामंजस्य करारांना मान्यता देण्यात आली. त्यानुसार व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसेच अक्षय ऊर्जा, खते आणि शेती, डिजिटल तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि औषध निर्मिती तसेच शिक्षण, संशोधन, पर्यटन, सांस्कृतिक वारसा आणि लोकसंपर्क या क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी ही एक नवी फलश्रुती होय. या दौऱ्यामुळे द्वीपक्षीय व्यापार दुप्पट होऊन पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच उभय देशातील सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. जॉर्डनच्या डिजिटल पेमेंट सिस्टम आणि भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस दरम्यान सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारत हा जॉर्डनचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार देश आहे, तर जॉर्डन हा भारताचा

फॉस्फेट आणि पोटॅश खतांचा प्रमुख पुरवठादार आहे. इफको आणि जॉर्डन फॉस्फेट कंपनी यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेली जॉर्डन इंडिया फर्टिलायझर कंपनी भारतासाठी फॉस्फेरिक अँटासिडचा एक प्रमुख स्त्राsत आहे. जॉर्डनच्या औद्योगिक क्षेत्रात 15 हून अधिक भारतीय मालकीच्या वस्त्र उत्पादक संस्था (युनिट) कार्यरत आहेत. सध्या जॉर्डनमध्ये 17,500 हून अधिक भारतीय निवास करतात. वस्त्राsद्योग, बांधकाम क्षेत्र तसेच उत्पादन आणि आरोग्य सेवा या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढत आहे.

विशेषत: भारत-जॉर्डन यातील संबंधांमध्ये एक नवी उंची मोदी पर्वामध्ये गाठली जात आहे. कारण दोन्ही देशांनी राजनैतिक संबंधांची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

भारत-जॉर्डन बिझनेस मंचाला उद्देशून संबोधन केले. त्यामध्ये त्यांनी जॉर्डनच्या सम्राटाचे कौतुक केले. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच फिन्टेक तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, औषध निर्माण क्षेत्र, कृषी, खते आणि ऊर्जा तसेच पायाभूत सुविधांचा विकास या क्षेत्रांतील संधींवर पंतप्रधानांनी विशेष प्रकाश टाकला. दोन्ही बाजूंनी विविध व्यवसायांतील सक्रिय भागीदारी शोधण्याचा आणि विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटल्याप्रमाणे जॉर्डनचा दौरा द्वीपक्षीय संबंधांतील सक्रिय भागीदारी आणि सहकार्याचे प्रतीक होय.

प्राचीन सभ्यतांचा संगम

भारत आणि इथिओपिया सांस्कृतिक संबंध हे दहा हजार वर्षांपूर्वीचे असून, प्राचीन काळात या दोन्ही संस्कृतींमध्ये विचार, कल्पना आणि मूल्यांची देवाण-घेवाण होत असे. दोन हजार वर्षांपूर्वी एक्सुमाइट साम्राज्याच्या काळात पहिल्या शतकापासून व्यापार भरभराटीस आला होता तसेच सहाव्या शतकात भारतातील व्यापारी प्राचीन बंदर अहुलिसमधून सोने आणि हस्तिदंतांच्या वस्तू तसेच रेशीम आणि मसाल्याचा व्यापार करत असत. एक मसाल्याची पिशवी सोन्या एवढ्या किमतीची मौलिक असे. 16 व्या शतकामध्ये गोव्यातील भारतीय पोर्तुगीज सैन्यासह इथिओपियाच्या राजाला इटलीच्या आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी मदत करत होते.

इटलीच्या इथिओपियावरील साम्राज्याचा ताबा संपविण्यासाठी मदत करणाऱ्या ब्रिटिश सैन्यात भारतीय सैनिकांचा मोठा समावेश होता. प्रामुख्याने 1936 ते 1941 पर्यंत भारतीय सैनिक इथिओपियात मोठ्या संख्येने होते. इथिओपियाच्या मुक्ती लढ्यात भारतीय सैनिकांनी भाग घेतला आणि स्वातंत्र्यासाठी एक नवे युग निर्माण केले. भारत आणि इथिओपिया यांच्यातील औपचारिक राजकीय संबंध 1950 पासून प्रस्थापित झाले आहेत. हे संबंध व्यापार, गुंतवणूक क्षमता, संवर्धन आणि शाश्वत विकास सहकार्य अशा बहुआयामी भागीदारीमध्ये विकसित झाले आहेत. भारतीयांनी तेथील उच्च शिक्षणाच्या विकासातही मोठा सहभाग नोंदविला आहे. व्यापार हा एक मध्यवर्ती आधारस्तंभ राहिला आहे. भारत आफ्रिकेतील विविध देशांमध्ये आघाडीचा व्यापारी भागीदार म्हणून याला महत्त्व देत आहे.

जी-20 आणि ब्रिक्स शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथिओपियाची बाजू लक्षात घेतली तसेच पंतप्रधान पुढील वर्षी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान डॉ. अबी अहमद आणि नरेंद्र मोदी यांच्यातील स्नेहसंबंध हे शिखर परिषदांतून भक्कम झाले आहेत. तंत्रज्ञान कौशल्य तसेच संसदीय संपर्क अशा नवनव्या गुंतवणूक क्षेत्रांतील संधी, शिक्षण, माहिती, तंत्रज्ञान, कृषी आणि लोकसंपर्क अशा अनेक क्षेत्रांतील द्वीपक्षीय संपर्क वाढविण्यावर सातत्याने भर देण्यात आला आहे.

तिसऱ्या व्हॉईस ऑफ द ग्लोबल साउथ शिखर परिषदेत इथिओपियाचा सहभाग भारताची बाजू भक्कम करणारा ठरला आहे. प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर उभय राष्ट्रांचे एकमत असून, दोघांनीही दहशतवादाचा सातत्याने निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भारताची भूमिका इथिओपियाचे नेते सातत्याने उचलून धरतात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी समान भूमिका घेतात. मंत्रिस्तरीय भेटीगाठी शिष्टमंडळे आणि उच्चस्तरीय संवाद यामुळे दोन्ही देशांतील मैत्री अधिक भक्कम झाली आहे.

संसदीय शिष्टमंडळाचे आदान-प्रदान हे सुद्धा लोकशाही संस्थांच्या सबलीकरणासाठी उपयुक्त ठरले आहे. दोन्ही देश परस्परपूरक हितवर्धक भूमिका घेऊन जागतिक राजकारण अधिक रचनात्मक आणि विधायक कसे बनेल, यावर भर देत आहेत. दोन्ही देशांतील व्यापार दुप्पट करण्याचा संकल्प स्वागतार्ह आहे.

(पूर्वार्ध)

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.