सक्रिय मान्सूनचा सह्याद्री पर्वतरांगेत धुमाकूळ
सत्तरीमध्ये जनजीवन विस्कळीत: अनेक ठिकाण पूरसदृश स्थिती: मात्र दुपारनंतर पाणी ओसरले
त.भा. विशेष प्रतिनिधी
पणजी : सक्रिय झालेल्या मान्सूनने सह्याद्री पर्वतरांगेत धुमाकूळ घातला आणि त्यामुळे गोव्याच्या पूर्व भागात कोसळलेल्या पावसाने त्या भागातील नद्यांना देखील पूर आला. सत्तरीमध्ये जनजीवन विस्कळीत झाले, तर सांगेमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक परिसर जलमय झाले. साखळीच्या वाळवंटी नदीच्या पाण्याचा स्तर देखील बराच वाढला. या भागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे त्या त्या परिसरातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे हा पाऊस असाच राहिला तर पुढील पंधरा दिवसात जवळपास सर्व धरणे भरतील असा अंदाज आहे.
पणजी, म्हापसा वगैरे भाग वगळता किनारी भाग सोडून इतर भागात गुऊवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. पणजीमध्ये दमट हवामान होते. अधूनमधून पावसाच्या सरी पडून जात होत्या परंतु पावसाला तेवढा जोर आला नाही. पावसाने आक्रमकपणा दाखवला तो सांगे, वाळपई, केपे, आणि साखळी या भागात. सत्तरी आणि साखळीमध्ये तसेच धारबांदोड्यामध्ये देखील दिवसभर पावसाचा जोर चालूच होता. या पावसाने त्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले.
सर्व धरणांमधील जलसाठ्यात वाढ
या मुसळधार पावसाचा फायदा अंजुणे धरणाला झाला. या धरणामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली, जी जुलैमध्ये अपेक्षित असते. त्याचबरोबर इतर धरणांमध्ये देखील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अंजुणे भागात सर्वाधिक पाच इंच पाऊस
गोव्यातील सर्वाधिक पावसाची नोंद अंजुणे धरण प्रकल्पाच्या ठिकाणी झाली असून तिथे जवळपास साडेपाच इंच पाऊस शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत झाला होता. याशिवाय गोव्याच्या बाजूला असलेले दोडामार्ग, भेडशी वगैरे भागात तसेच तिळारी, चोर्ला, कणकुंबी या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे गोव्यातील नद्यांमध्ये पाण्याचा स्तर बराच वाढला.
साखळी, सत्तरीत पूरसदृश स्थिती
साखळीच्या वाळवंटी नदीमध्ये शुक्रवारी सकाळी पुरसदृश स्थिती निर्माण झाली. वाळवंटीचे पाणी पात्राच्या बाहेर पोहोचले, मात्र दुपारनंतर पाण्याचा जोर ओसरला. सत्तरीमध्ये अनेक भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. धारबांदोडा तालुक्यामध्ये देखील काही रस्ते पाण्याखाली गेले. सांगे तालुक्यांमध्ये देखील हीच अवस्था होती. त्या तुलनेत काणकोणमध्ये मर्यादित प्रमाणात पाऊस पडला. मात्र फोंडा तालुक्यात जवळपास पावणे दोन इंच पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत पडला.
आठवड्याभरानंतर मिळाला दिलासा
गेला आठवडाभर पावसाने दडी मारल्यामुळे एक प्रकारे नव्याने चिंता निर्माण झाली होती, मात्र या पावसामुळे बऱ्या प्रमाणात दिलासा मिळाला. तसेच संपूर्ण गोव्यात मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस पडल्यामुळे शेतीला देखील वरदान ठरले. राज्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठा फारच कमी प्रमाणात होता, मात्र गुऊवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे व शुक्रवारी दिवसभर त्या परिसरात मुसळधार पाऊस चालू होता.
साळावली धरणातही पाणी वाढ
धरणांमध्ये आता समाधानकारक स्थिती निर्माण होत आहे. शुक्रवारी सकाळी धरणांमध्ये पाण्याची आवक 24 टक्क्यांवरुन 26 टक्क्यांपर्यंत वाढली होती. दिवसभरात त्या परिसरात जोरदार पाऊस पडल्यामुळे पाण्याची टक्केवारी देखील पुन्हा वाढलेली आहे. साळवली धरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने तिथेही समाधानकारक स्थिती आहे. तिलारी धरण परिसर आणि तिळारी घाटामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे धरणांतर्गत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे आणि त्यामुळेच धरणाची स्थिती समाधानकारक होत आहे.
गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात 1.66 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली. अद्याप गोव्यात 36 टक्के पाऊस कमीच आहे. पणजी वेधशाळेने दुपारी गोव्यात यलो अलर्ट जारी केला असून तो केवळ शुक्रवारसाठीच होता. आज शनिवारपासून गोव्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही भागात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान 23 जुलैपर्यंत गोव्यात सर्वत्र तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अद्यापही पावसाचे प्रमाण वार्षिक सरासरीच्या तुलनेत 36 टक्क्यांनी कमी असून एव्हाना 60 इंच पाऊस होणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद सरासरी 38 इंच एवढी झालेली आहे.