कर्मे प्रकृतीच्या सात्विक, राजस, तामस गुणांकडून केली जातात
अध्याय तिसरा
भगवंत म्हणले, ह्या लोकी जो समर्थ आहे त्याने कर्मत्याग अजिबात करू नये. अज्ञानी माणसे कर्मफलाच्या ओढीने कर्मे करतात. लोकसंग्रहांची इच्छा करण्राया ज्ञानी पुरुषाने त्याच ओढीने पण फळाची अपेक्षा सोडून कर्मे करावीत. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कर्म करून सर्वांना सन्मार्ग दाखवावा. त्यांच्यात मिळूनमिसळून रहावे, आपण कर्ममार्गाचे आचरण करतोय म्हणजे विशेष काही करतोय असे दाखवण्याचा प्रयत्न करू नये, कर्मामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. आपण स्वत: परमेश्वराशी एकरूप होऊन कर्मे उत्तम प्रकारे करावीत आणि अज्ञानी लोकांकडूनही तशीच करवून घ्यावीत. अज्ञानी मनुष्य स्वत:ला कर्ता समजत असतो हे लक्षात घेऊन भगवंत पुढील श्लोकात सांगतायत की, सर्व कर्मे प्रकृतीच्या सात्विक, राजस, तामस गुणांकडून केली जातात परंतु अज्ञानी अहंकाराने ह्या कर्माचा “मीच कर्ता आहे” असे मानतो.
कर्मे होतात ही सारी प्रकृतीच्या गुणामुळे । अहंकार-बळे मूढ कर्ता मी हे चि घेतसे ।।27।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, हे धनुर्धरा ! दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर घेतले, तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? माणसाचे तसेच होते, त्यांची खरी ओळख आत्मा अशी आहे आणि आत्मा तर काहीच करत नसतो परंतु हे लक्षात न घेता प्रकृतीच्या गुणामुळे होणाऱ्या चांगल्या वाईट कर्मांचे ओझे तो अज्ञानी मनुष्य, स्वत:ला कर्ता समजून त्याच्या शिरावर घेतो. करत असलेली सगळी कर्मे अहंकाराने मी करतो असे म्हणतो. अशा अहंकाराच्या घोडयावर आरूढ झालेल्या आणि स्वत:ला शहाण्या समजणाऱ्या अज्ञानी माणसाला हे गूढ तत्वज्ञान सांगू नये. पुढील श्लोकात भगवंत सांगतात, हे महाबाहो अर्जुना ! गुणविभाग व कर्मविभाग हे आपल्याहून भिन्न आहेत, असे जाणणारा आत्मज्ञानी पुरुष गुण त्यांच्या वैशिष्ट्यांप्रमाणेच वागणार हे समजून त्यात आसक्त होत नाही.
गुण हे आणि ही कर्मे ह्यांहुनी वेगळा चि मी । जाणे तत्त्व-ज्ञ गुंते ना गुणात गुण वागता ।।28।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे निर्माण होतात, ते प्रकृतीचे विकार आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी असत नाहीत. आत्मज्ञानी देहाचा अभिमान टाकून, गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी कर्मे यांची वेस ओलांडून देहाच्या ठिकाणी साक्षीत्वाने राहतात. सूर्य ज्याप्रमाणे त्याच्या प्रकशात चालणाऱ्या प्राणीमात्रांच्या बऱ्या-वाईट व्यवहारात लक्ष घालत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाने देह धारण केला असला, तरी तो देहाच्या व्यवहारात लक्ष घालत नाही. सामान्य माणसे मात्र कर्म मी केले असे म्हणून फळाच्या अपेक्षेत गुंतून पडतात. ह्या मुद्यावर पुढील श्लोकात भगवंत सांगतात, प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष गुण व कर्म ह्यात गुंतून पडले आहेत हे आत्मज्ञानी माणसाच्या लक्षात येते तरी त्याने अशा अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. तसे केल्यास ते करत असलेले कर्मही करणार नाहीत.
गुंतले गुण-कर्मी जे भुलले प्रकृती-गुणे । त्या अल्प जाणणारांस सर्व-ज्ञे चाळवू नये ।। 29 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, या जगामध्ये जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागत असतो, त्याला त्यानेच कर्म केले आहे ह्या समजुतीतून फळाची अपेक्षा असल्याने तो त्या कर्माने बध्द होतो. त्याच्या हे लक्षात येत नाही की, गुंणाच्यामुळे इंद्रिय आपआपली कर्मे करत असतात.
क्रमश: