साखर कारखान्यांविरोधातील तक्रारींवर 24 तासात कारवाई करू
मंत्री शिवानंद पाटील : ऊस उत्पादकांना आश्वासन
बेळगाव : शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडून फसवणूक झाल्याची तक्रार पुराव्यानिशी केल्यास त्याविरोधात 24 तासात कारवाई हाती घेण्यात येईल, असे आश्वासन साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी दिले. सोमवारी विधानपरिषदेमध्ये ते बोलत होते. साखर कारखान्यांविरोधात तक्रार करण्यास शेतकऱ्यांनी भय राखण्याचे कारण नाही. काटामारी होत असल्यास संबंधित कारखान्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. साखर कारखान्यांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाल्यास संबंधित शेतकऱ्याला 1 लाखाचे बक्षीस देण्यात येईल. त्याशिवाय संबंधित शेतकऱ्याच्या उसाचे गाळप करण्याची जबाबदारी सरकार घेईल, असे मंत्री शिवानंद पाटील म्हणाले.
काटामारी होते का? याची पाहणी वजन-मापन खात्याचे अधिकारी कारखान्यांना प्रत्यक्ष भेट देऊन करीत आहेत. डिजिटल वजन यंत्र वापरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या या उपक्रमाबाबत काही साखर कारखान्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. मात्र, काटामारी प्रकरणात सरकार तडजोड करणार नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न असतील.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी सुवर्णसौधजवळ छेडलेल्या आंदोलनस्थळाला मंत्री पाटील यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. साखर आयुक्त कार्यालय बेळगावला स्थलांतर करण्यात येईल. सहकार क्षेत्रातील स्थगित साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांना अतिरिक्त 150 रुपये रक्कम देण्याचे आमच्या सरकारचे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांची थकीत बिले साखर कारखान्यांनी पूर्ण प्रमाणात देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येतील. मागील सरकारात नुकसानीतील 13 सहकारी साखर कारखाने कंत्राटी पद्धतीने चालविण्यात येत आहेत. सहकार क्षेत्रातील कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आमचे प्रयत्न आहेत, असेही मंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले.