ड्रग्ज नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई
गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचा इशारा : बेंगळुरात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
बेंगळूर : ड्रग्ज उत्पादन नेटवर्कच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना केवळ निलंबितच करणार नाहीत तर त्यांना सेवेतून काढून टाकण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिला. रविवारी बेंगळूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. बेंगळूरमध्ये ड्रग्ज उत्पादन युनिट सापडल्यानंतर आम्ही कोणतीही सबब सांगणार नाही. परंतु आम्ही ड्रग्ज कारवायांविऊद्ध कठोर कारवाई केली आहे. बेंगळूरमध्ये एका ठिकाणी ड्रग्ज उत्पादन युनिटचे काम सुऊवातीच्या टप्प्यात होते. तेथे अद्याप ड्रग्ज तयार आणि विकले जात नव्हते. जर ते विकले जात असते तर पोलिसांनी त्यांना पकडले असते, असेही गृहमंत्री परमेश्वर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र पोलिसांना तयारीच्या टप्प्याची माहिती मिळाली होती. ते तिथून इथे येऊन राज्याच्या पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. बेंगळूर पोलिसांना माहिती न देता ही कारवाई झालेली नाही. त्या कारवाईत बेंगळूरचे डीसीपी वैयक्तिकरित्या सहभागी होते. अमली पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कारवाई केली जात आहे. ही एक-दोन जणांची जबाबदारी नाही, असेही ते म्हणाले. एनडीपीएस ही एक राष्ट्रीय कृती असून सर्व राज्ये त्याचे पालन करतात. ही संयुक्त कारवाई आहे. आम्हीही इतर राज्यांमध्ये कारवाई करून आरोपींना अटक करतो. तेव्हा तेथील पोलीस अपयशी ठरले आहेत, असे आम्ही असे म्हणू शकत नाही. आणखी 2-3 प्रकरणांत आम्ही इतर राज्यांमध्ये कारवाई करण्यास तयार आहोत. जर इतर राज्यांतील पोलीस कर्नाटकात येऊन कारवाई करत असतील तर ते चुकीचे म्हणता येणार नाही, असेही परमेश्वरांनी स्पष्ट केले.