कर्कश आवाजात गाणी लावणाऱ्या ट्रॅक्टरचालकांवर कारवाईचा धडाका
पाच तालुक्यात 290 साऊंड सिस्टीम जप्त
बेळगाव : ट्रॅक्टर चालवताना कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम लावू नये, असा इशारा देऊनही साऊंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या 290 हून अधिक ट्रॅक्टरचालकांवर कारवाई करून साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांनी यासंबंधी मोहीम राबवली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी वाहन अपघातात 800 हून अधिक जणांचा मृत्यू होतो. खासकरून ऊस हंगामात अपघात व अपघात बळींची संख्या अधिक असते. ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावली जाते. त्याचा सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांनाही त्रास होतो. न्यायालयाच्या आदेशावरून ठरावीक डेसिबलपर्यंतच साऊंड सिस्टीमला मुभा आहे. ध्वनी प्रदूषण होईल, अशी गाणी वाजवणाऱ्या ट्रॅक्टरचालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गेल्या आठवडाभरापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिला होता.
यासंबंधी सर्वत्र जागृतीची मोहीमही राबविली होती. तरीही मोठ्या आवाजात ट्रॅक्टरवर गाणी वाजवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 290 ट्रॅक्टरमधून साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आल्याचेही जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले आहे. यासंबंधी बुधवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. सर्वसामान्य नागरिक, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी यांना होणारा त्रास लक्षात घेऊन व वाढते अपघात टाळण्यासाठी कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले आहे. बैलहोंगल, रामदुर्ग, चिकोडी, अथणी व गोकाक उपविभागातील प्रत्येक पोलीस स्थानकात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम लावणाऱ्या ट्रॅक्टरचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात कायद्यात कारवाईसाठी तरतुदी काय आहेत? कितीपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे? यासंबंधीची माहिती जिल्हा पोलीसप्रमुखांनी दिली होती. आता थेट कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.