आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई होणारच! पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण
नियमांची माहिती खासदारांना अवगत केली जाईल; पाटणला मुख्यमंत्र्यांची सभा होणार
सातारा प्रतिनिधी
सातारा जिह्यात लेझर लाईटला बंदी असणार आहे. त्याचबरोबर जे गणेशोत्सव मंडळ डेसीबलची मर्यादा ओलांडेल त्यांच्यावर ज्या न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसार कायदेशीर कारवाई आमचे पोलीस करतील, खासदार उदयनराजे यांनी नेमके काय म्हणले आहे, त्याची माहिती घेवून आम्ही त्यांना सर्व माहिती अवगत करु, असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दरम्यान, पाटण तालुक्यात विविध विकासकामांच्या भूमीपूजन उद्घाटनानिमित्ताने दि. 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असून त्यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ होणार आहे. त्यांची जाहीर सभाही पाटणला होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, माता भिमाई आंबेडकर स्मारकाचा प्रश्न रखडलेला होता. त्याबाबत आमदार महेश शिंदे यांनी सूचना करताच बैठक घेवून तो रखडलेला प्रश्न शासनाच्यावतीने मार्गी लावला आहे. तात्काळ निधी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे सागंत ते म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघातील भूमीपूजन कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी यावे म्हणून निमंत्रण दिलेले आहे. तारळी प्रकल्पातंर्गत तारळी धरणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पाच उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी मी गेली चार वर्षे पाठपुरावा करत होतो. त्या योजनेच्या माध्यमातून 100 मीटरवर उचलून पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे तारळे भागातील जी गावे आजपर्यंत वंचित होती त्यांना पाणी मिळणार आहे. तसेच मोरणा गुरेघर धरणाच्या उजवा आणि डावा तीरावर पाईपलाईनचे कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. नाटेशी उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामाचे भूमीपूजनही करण्यात येणार आहे. स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यसन केंद्राचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच पाटण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा केंद्रासाठी मुख्यमंत्र्यांनी 22 कोटी मंजूर केले आहेत. त्याही कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. पाटण तालुक्यात प्रथम पाटणात छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. सर्व परवानग्या घेवून तो उभारण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची जाहीर सभा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत स्थानिक गावांनी ठराव दिलेले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत हा प्रकल्प चांगला कसा होईल हे पाहिले जात आहे. डॉ. भारत पाटणकर यांचे जे काही म्हणणे असेल ते ऐकून घेण्यासाठी त्यांच्यासमवेत बैठक घेवू, असेही त्यांनी सांगितले.
नमस्कार चमत्कार कॉफीपान झाले
मीडियांनी गैरसमज करून घेवू नये. प्रोटोकॉलनुसार अधिकारी, शिपाई हे कलेक्टर ऑफिसच्या खाली मला रेसिव्ह करायला आले होते. तेव्हा मी त्यांना विचारलं एवढी गर्दी का, तेव्हा त्यांनी आमदार शशिकांत शिंदे हे आल्याचे सांगितले. मी त्यांना घेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये आलो. तेथे कॉफी सोबत घेऊन गप्पा झाल्या. गप्पामध्ये वेगळे असे काही झाले नाही. नमस्कार चमत्कार झाला, ते दोन पाऊल मागे आले मी दोन पाऊले पुढे आलो. मैत्री ही मैत्री असते. मी पक्षाचा सच्चा शिवसैनिक आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा साधा शिवसैनिक आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर ते विरोधी बोलत असल्याचे सांगताच ते म्हणाले, विरोधी पक्षाचे कामच आहे, असे त्यांनी सांगितले. माझ्याकडे त्यांनी कसलीही तक्रार केली नसल्याचा निर्वाळा दिला.
खासदार उदयनराजेंना सर्व माहिती देणार
न्यायालयाने जे निर्बंध घातले आहेत, ते पाळलेच पाहिजेत. त्या नियमांचे अनुकरण प्रत्येक मंडळाने केले पाहिजे. मी जेव्हा आढावा बैठक घेतली तेव्हाच सूचना दिल्या आहेत. जे कोणी नियमाच्या बाहेर जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल, दरम्यान, खासदार उदयनराजे यांनी नेमके कोणते वक्तव्य केले आहे, डीजेबाबत त्यांच्या वक्तव्याचा अर्थ नेमका काय निघतो आहे ते पाहूनच त्यांना सर्व माहिती अवगत केली जाईल, कोणत्याही मंडळाकडून लेझर लाईट लावली जाणार नाही. तशा सक्त सूचना दिल्या गेल्या आहेत, असेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.