आमदारांचा अनादर करणाऱ्यांवर होणार कारवाई
विधानसभेत संताप : कारवाईची जबाबदारी हक्कभंग समितीकडे : सभाध्यक्षांच्या भूमिकेचे स्वागत
प्रतिनिधी/ बेंगळूर
आमदारांचा आदर न करता उद्धट वर्तन करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध मंगळवारी विधानसभेत पक्षभेद विसरून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावर उत्तर देताना सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी अधिकारी हे सरकारचे सेवक आहेत. त्यामुळे आमदारांचा आदर न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई करण्याची जबाबदारी हक्कभंग समितीवर सोपविण्यात आली आहे, अशी घोषणा केली.
काँग्रेसचे आमदार राजू कागे यांचा अनादर करणारे महसूल खात्याचे मुख्य सचिव राजेंद्र कटारिया आणि भाजप आमदार बसवराज मत्तीमोड यांच्याशी गैरवर्तन करणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश मेघन्नावर यांचे वर्तन योग्य नाही. कोणत्याही आमदाराचा अनादर होणे कदापी खपवून घेतले जाणार नाही. सरकारने देगील आमदारांच्या पाठिशी राहिले पाहिजे. या अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाची तक्रार हक्कभंग समितीकडे सोपवणार आहे. तेथेच शिक्षेविषयी निर्णय झाला पाहिजे, असे विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले.
हक्कभंग समितीने आमदारांविषयी गैरवर्तन केल्याप्रकरणाची त्वरित चौकशी करावी तसेच कोणती शिक्षा द्यावी, हे ठरवावे. आमदार म्हणजेच सरकार. अधिकारी हे सरकारचे सेवक. आमदारांशी अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागावे. अधिकाऱ्यांनी आमदारांशी उद्धटपणे वर्तन केल्याचे सहन करणार नाही, असा इशाराही सभाध्यक्षांनी दिला. यावेळी आमदारांनी सभाध्यक्षांच्या निर्णयाचे स्वागत केले.
प्रत्येकाचा आदर मिळायला हवा. अधिकाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. त्यांनी आयएएसचा अभ्यास केला असेल, पण सभ्यतेने वागण्याची सवय लावून घ्यावी. अन्यथा अधिकाऱ्यांनाही आदर मिळणार नाही. आमदारांचा अनादर केल्याप्रकरणाची मी गांभीर्याने दखल घेतली आहे. ही सर्वांसाठी एक धोक्याची घंटा असावी, म्हणूनच मी हे प्रकरण हक्कभंग समितीकडे सोपविले आहे, असेही सभाध्यक्षांनी स्पष्ट केले.
कायदा आणि संसदीय कामकाज मंत्र्यांनी आमदारांचा अनादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा करुया, असे मत व्यक्त केले. मात्र, माझ्या मते हे गरजेचे नाही. आमदारांचा आदर न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण हक्कभंग समितीकडे सोपविले आहे, असे सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगताच आमदारांनी बाकडे वाजवून आनंद व्यक्त केला.