परवाना नसलेल्या शाळांवर होणार कारवाई : झिंगडे
शिक्षण खात्याचे अधिकारी करणार सर्वेक्षण
पणजी : गोव्यात काही पूर्व प्राथमिक शाळा शिक्षण खात्याचा परवाना न घेता चालविल्या जात आहेत. याबाबतच्या तक्रारी शिक्षण खात्याकडे आलेल्या आहेत. यामध्ये काही शाळांनी अर्ज केले आहेत. परंतु त्यांचे अर्ज मंजूर होण्यापूर्वीच शाळा सुरू केलेल्या आहेत. अशांवर कारवाई करण्यासाठी खात्याने पावले उचलली आहेत, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पर्वरी येथील शिक्षण खात्याच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला गोवा समग्र शिक्षा अभियानाचे अध्यक्ष शंभू घाडी तसेच शिक्षण खात्याचे उपसंचालक मनोज सावईकर उपस्थित होते.
झिंगडे यांनी सांगितले की, शिक्षण विभागाचे अधिकारी येत्या 15 मार्चपासून पूर्व प्राथमिक शाळांचे सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणात परवाना नसताना शाळा सुरू केल्याचे आढळल्यास 50 हजार ऊपये दंड केला जाईल. त्यानंतरही शाळा सुरू राहिल्यास दिवसाला 10 हजार ऊपये दंड आकरण्यात येणार आहे. पूर्व प्राथमिक शाळांची वाढती संख्या लक्षात घेता यामध्ये अनेक शाळा ह्या विनापरवाना चालविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनीही मुलांना शाळेत प्रवेश देताना परवानाप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहनही शिक्षण खात्यातर्फे करण्यात आले आहे.