महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एनपीए’वाल्यांवर होणार कारवाई

04:00 PM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांचा इशारा : थ्रिफ्ट असोसिएशनतर्फे सहकार सप्ताह उत्साहात

Advertisement

फोंडा : गोव्यातील चार ते पाच महत्त्वाच्या सहकारी बँका बुडाल्या असून साधारण दोन हजार बँक खात्याचे एनपीए वाढले आहेत. अशा सहकारी पतसंस्था आणि गोवा डेअरीसारख्या संस्था सहकारमंत्र्यांना नेहमीच मनस्ताप देणाऱ्या ठरत आहेत. अशा गैरप्रकारांवर कुठेतरी नियंत्रण आलेच पाहिजे. त्यासाठी कठोर पावले उचलली जाणार असून येत्या दोन महिन्यात अशा संस्थांनी कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला आहे. थ्रिफ्ट को ऑपरेटिव्ह असोसिएशनतर्फे रविवारी 71 राष्ट्रीय सहकार सप्ताह फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरमध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री सुभाष शिरोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Advertisement

कर्मचारी गुंतून पडलेत एनपीएत 

सहकारी बँकांचे एनपीए वाढल्याने जनतेची कोट्यावधी ऊपयांची गुंतवणूक असुरक्षित आहे. सहकार खात्यातील पन्नास टक्के कर्मचारी एनपीएचा हा गुंता सोडविण्यासाठी गुंतून पडलेला आहे. गावोगावी धान्याचे वितरण करणाऱ्या स्वस्त धान्य वितरण सोसायट्यांमध्येही आता बदल होण्याची वेळ आली आहे. काही किलो धान्यासाठी वयस्क महिला व नागरिकांच्या लागणाऱ्या रांगा यापुढे थांबल्या पाहिजेत. या सोसायट्यांनी आता ग्राहकांना घरपोच सेवा देण्याची वेळ आली असून त्यासाठी सरकार थोडीफार जबाबदारी उचलायला तयार असेल, असेही त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर माजी खासदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, सहकार निबंधक खात्याचे अधिकारी सावियो नेटो, थ्रिफ्ट असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, प्रमुख वक्ते डॉ. सुब्रह्मण्यम भट, थ्रिफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी साळू भगत, संचालक बिंदिया नाईक, उमाकांत नाईक, कमलाकर देसाई, आरती नाईक, हेमंत कासार, सरोजिनी कोमरपंत, दत्ताराम मयेकर, अनिल आर्लेकर, बाबू उपर्डेकर हे उपस्थित होते.

अॅड. नरेंद्र सावईकर म्हणाले, सहकार हे भारतीय समाज व्यवस्थेसाठी नवीन नसून ती येथील ग्रामीण जीवनात खूप वर्षांपासून रुजलेली एक परंपरा आहे. परस्पराच्या विश्वासावरच सहकाराची समृद्धी आहे. संगणकीकरण व डिजिटलायझेशन ही काळाची गरज असून नवीन पिढीनेही या क्षेत्रात येण्याची गरज आहे. सहकार क्षेत्रातील नवीन आव्हाने तरुण पिढीच अधिक चांगल्याप्रकारे पेलू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उल्हास फळदेसाई म्हणाले, भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकाविषयी कडक धोरण अवलंबल्यामुळे यापुढे अशा आर्थिक संस्थांना आपला व्यवहार अधिक पारदर्शक ठेवावा लागणार आहे. तसेच ऑनलाईन व्यवहारामध्ये सहकारी बँकांना यापुढे जुळवून घ्यावे लागेल. सरकारनेही बॅकअप सबसीडी वेळेत देण्याची मागणी त्यांनी केली. स्वागतपर भाषणात पांडुरंग कुट्टीकर यांनी थ्रिफ्ट संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. ‘विकसित भारतासाठी सहकाराची भूमिका’ या विषयावर डॉ. सुब्रह्मण्यम भट यांचे व्याख्यान झाले.

उत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून उत्तर गोव्यातून सहकार खाते कर्मचारी पतसंस्था तर दक्षिण गोव्यातून मडगाव हॉस्पिसियो आरोग्य सेवा कर्मचारी पतसंस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट अध्यक्ष म्हणून उत्तर गोव्यातून सत्तरी वीजखाते कर्मचारी पतसंस्थेचे झिलबा मळीक यांना तर दक्षिण गोव्यातून सांगे तालुका सरकारी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे कमलाकर देसाई, उत्कृष्ट कॉऑपरेटर म्हणून सखाराम देगवेकर यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. पीईएस कर्मचारी पतसंस्था फर्मागुडी व सत्तरी तालुका बीडीओ व मामलेदार कर्मचारी पतसंस्थेला प्रोत्साहन प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. गोवा डेअरी कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत सावंत तसेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट मुख्य कार्यकारी हा पुरस्कार लाभल्याबद्दल साळू भगत यांनाही मंत्री सुभाष शिरोडकर यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. साधारण दोनशे गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 5000 चे आर्थिक साहाय्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन थ्रिफ्टच्या संचालिका प्रिया टांगसाळे यांनी केले. तर संचालक अशोक परब यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article