निधी वेळेत खर्च न झाल्यास कारवाई
सांगली :
जिल्हा वार्षिक योजनेसह शासनाकडून विविध योजनेतून आलेला निधी वेळेत खर्च करा. निधी खर्चात हलगर्जीपणा केल्यास संबधित अधिकार्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, कामात कुचराई करणार्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा कडक इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती धोडमिसे यांनी दिला आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसहितेचे कारण पुढे करून शासन निधी शेवटच्या क्षणापर्यंत खर्च न करण्याकडे अनेक विभागांचा कल असतो. बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये सर्व विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी धोडमिसे यांनी हा इशारा दिला. यावेळी पशुसंवर्धन, ग्रामपंचायतीच्या जनसुविधा, नागरी सुविधा, बांधकामकडील रस्ते विकास व मजबुतीकरण, प्राथमिक शाळांच्या इमारतीचे बांधकाम, वर्गखोल्या दुरूस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इतारतीचे बांधकाम अशा विविध कामासाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा आढावा घेण्यात आला.
पाणी योजना वेळेत कार्यरत करा
जिह्यात बहुसंख्य गावात जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी नळजोडणी कामे सुरू आहेत. दोन्ही योजनेची कामे वेळेत पुर्ण करून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करा. कामात कुचराई करणार्या कर्मचारी आणि ठेकेदाराला समज द्या, प्रसंगी स्थानिक पातळीवर नियमानुसार कारवाई करा, अशा सूचानाही धोडमिसे यांनी बैठकीत दिल्या.
जिह्यात तंबाखूमुक्त कार्यालय व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी प्रयत्न करावेत. मागासवर्गीसाठी राबविण्यात येणार्या योजना, महिला व बालविकास आणि दिव्यांग कल्यासाठी असलेल्या योजनांच्या खर्चाचे उद्ष्टि वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही धोडमिसे यांनी यावेळी दिले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून राबवण्यात येणार्या घरकूल योजना वेळेत पूर्ण करा. जागा नसलेल्या घरकूलचा लाभ देण्यासाठी गावात जागा उलब्ध करून देण्यासाठी अधिकार्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.
त्यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदीनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, मुख्य लेखा वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करा
जिह्यात काही वर्षांपासून मॉडेल स्कूल अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेत भौतिक आणि गुणवत्तेची सुधारणा करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने यापुढे स्मार्ट शाळा अधिकाधिक होण्यासाठी प्राधान्य द्यावेत. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी भर द्या, अशा सूचनाही धोडमिसे यांनी बैठकीत दिल्या आहेत.