रत्नागिरीत दोन एलईडी नौकांवर कारवाई
रत्नागिरी :
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांच्या स्पष्ट निर्देशानंतर मत्स्य व्यवसाय विभागामार्फत शुक्रवारी रात्री जयगड येथे एलईडी नौकेवर कारवाई करण्यात आली. त्यात ३ तांडेलांसह ताब्यात घेत अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली. तर या कारवाईनंतर विभागाने अवघ्या १२ तासात जयगड येथे आणखीन एक अनधिकृत मासेमारी करणारी दुसरी नौका पकडली. त्यावरील सुमारे ८-९ लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
मत्स्य व्यवसाय विभागाने अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी करडी नजर रोखली आहे. त्यानुसार ७मार्च रोजी रात्री जयगडसमोरील समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, जयगड) व स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, गुहागर) हे गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली मोहम्मद हनिफ हसनमिया तांडेल (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) यांची नौका अल-हज-हसन (आयएनडी एमएच ४ एमएम ५७०१) द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात जयगडसमोर अनधिकृतरित्या एलईडी लाईटव्दारे मासेमारी करत असताना पकडले. या नौकेवर नौका तांडेलसह ३ खलाशी होते.
ही नौका जप्त करून जयगड बंदरात ठेवण्यात आली. त्या नौकेवर मासळी आढळलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून ठेवण्यात आली आहेत. अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त आहे. करण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकारी स्मितल कांबळे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व स्वप्निल चव्हाण, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक जयगड सुजन पवार व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक गुहागर विनायक शिंदे आणि सागरी सुरक्षारक्षकांच्या सहकार्याने ही कारवाई केली. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, रत्नागिरी यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एलईडी नौकेवर कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या नौकेवर मासळीचा साठा आढळलेला नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. अंदाजे ८-९ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली. या नौकेवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहे व नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, रत्नागिरी यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे.
- १२ तासात आणखी एका एलईडी नौकेवर कारवाई
जयगड समुद्रात शुक्रवारी रात्री एलईडी मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकेवर कारवाई केल्यानंतर शनिवारी ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मत्स्य व्यवसाय विभागाने महालक्ष्मी नौका (क्र. आयएनडी-एमएच-४-एमएम-२८१३) ताब्यात घेतली. या नौकेची झडती घेतली असता नौकेवर एलईडी बल्ब व जनरेटर आढळून आले. या नौकेवरील ८-९ लाखांचे एलईडी साहित्य जप्त करून ती नौका मिरकरवाडा बंदरात ठेवण्यात आली आहे.