मांजा दोऱ्याची विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर कारवाई
संबंधित दुकानदारांवर केपी कायद्यानुसार गुन्हा दाखल : पोलीस आयुक्तांकडून दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्याची सूचना
बेळगाव : धोकादायक मांजा दोरा गळ्याला लागून दोन दिवसांपूर्वी शहरात एक बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. हा प्रकार पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गांभीर्याने घेतला असून शहरात मांजा दोऱ्याची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सोमवार दि. 20 रोजी मार्केट आणि एपीएमसी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून मांजा दोरा जप्त केला आहे. तसेच संबंधित दुकानदारांवर केपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी पतंगाचा मांजादोरा गळ्याभवती अडकून शहापूर येथे तीन वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली आहे. आईवडिलांसोबत सायंकाळी 7 च्या दरम्यान ती मोटारसायकलवरून जात होती. समोर बसलेल्या बालिकेच्या गळ्याला धारदार मांजा लागल्याने तिच्या गळ्याला गंभीर इजा पोहोचली आहे. यापूर्वीही शहर व परिसरात मांजामुळे अनेकांचे गळे चिरले असून काहींचा मृत्यूही झाला आहे.
ही बाब लक्षात घेत ज्या ज्या ठिकाणी धोकादायक मांजा दोऱ्याची विक्री केली जाते, त्या दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना केली आहे. त्यानुसार मार्केट पोलिसांनी कोतवाल गल्ली येथील एका दुकानावर छापा टाकून मालक फारुखअहमद गुलाबअहमद मुल्ला (वय 75) रा. कोतवाल गल्ली यांच्याकडून मांजा जप्त केला आहे. त्याचबरोबर एपीएमसी पोलिसांनी वैभवनगर येथील एका दुकानावर छापा टाकून दुकान मालक जमीर कुतुबुद्दीन कशनट्टी रा. वैभवनगर याच्याकडून मांजा दोरा जप्त केला आहे. यांच्या विरोधात केपी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांजा दोऱ्याचा वापर टाळा
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शहरातील सर्व मांजादोरा विक्री करणाऱ्या दुकानदारांना सक्त सूचना केली असून पतंग उडविताना आपल्या पाल्यांवर पालकांनी लक्ष ठेवावे, त्याचबरोबर पतंग उडविणाऱ्यांनी मोकळ्या जागेत उडवावी व मांजा दोऱ्याचा वापर टाळावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
- पोलीस आयुक्त भूषण बोरसे