टँकरमधून गॅस चोरणाऱ्या तस्करांवर कारवाई
सातारा :
सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील खंबाटकी घाट नजीकच्या बंद पडलेल्या ढाब्याच्या पाठीमागे अवैध सिलेंडरचा साठा करून घरगुती व व्यावसायिक विक्री करणाऱ्यांवर मुंबई येथील राज्यस्तरीय पुरवठा दक्षता पथकाने कारवाई करून सुमारे 71 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये दोन जणांना अटक केली.
महाराष्ट्र नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा विभागाचे संचालक सुधाकर तेलंग यांना गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी अवैध धंदा चालत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सुधाकर तेलंग यांनी उपनियंत्रक शिधावाटप गणेश बेल्लाळे व सहाय्यक नियंत्रक शिधावाटप विनायक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक बनवून सातारा येथे पाठवले. मुंबई येथील हे दक्षता पथक गेले दोन दिवसापासून या ठिकाणी पाळत ठेवून होते. मंगळवारी पुणे सातारा रोडवर खंडाळा येथे खंबाटकी घाट जवळ बंद पडलेल्या गुरुनानक पंजाबी ढाब्यावर पथकाने योग्य वेळ साधून गॅस टँकरमधून अवैधरित्या गॅस चोरी करून ते व्यावसायिक व घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये भरताना मोहम्मद तौफिक व हरीओम सिंग या दोघांना पकडले. काही गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाले. देवराज जानी या इसमाचा हा अवैध धंदा आहे. सदर कारवाई दरम्यान 2 गॅस टँकर, 2 टेम्पो, 200 सिलेंडर व चोरी करण्याचे साहित्य असे एकूण 80 लाख 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून खंडाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत पुरवठा विभागाचे राजीव भेले, प्रकाश पराते, मच्छिंद्र कुठे, सुधीर गव्हाणे, चंद्रकांत कांबळे, सागर वराळे, संदीप दुबे यांनी सहभाग घेतला.
- गॅस चोरीवर नजर ठेवणार
अशाप्रकारे टँकरमधून गॅस काढणे हे धोकादायक असून या प्रकारामुळे मोठा अपघात घडू शकतो. तसेच परवाना नसताना सिलिंडरची साठवणूक व विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे. राज्यभर पुरवठा विभाग कार्यालयाकडून या प्रकारांवर नजर ठेवण्यात येणार आहे.
सुधाकर तेलंग महाराष्ट्र नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा विभाग संचालक