जिल्ह्यात वर्षभरात सहा बोगस डॉक्टरांवर कारवाई
सर्वाधिक गुलबर्गा जिल्ह्यात 111 डॉक्टरांवर कारवाई : आरोग्य खात्याकडून मार्गसूची जारी
बेळगाव : राज्यासह जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना त्यांच्याकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यात एकूण 1214 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे तर 2024-25 मध्ये बेळगाव जिल्ह्यात 6 बोगस डॉक्टरांवर आरोग्य खात्याने कारवाई केली आहे. बोगस डॉक्टरांवर नियंत्रण आणताना आरोग्य खात्याच्या नाकीनऊ येत आहेत. राज्यात 2023 पासून 2025 या काळात सुमारे 1214 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. 2024-25 मध्ये आरोग्य खात्याने केलेल्या कारवाईत एकूण 256 बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यात आला आहे. तर 89 क्लिनिक बंद करण्यात आली आहेत. तसेच 154 बोगस डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण 4 प्रकरणांची नोंद झाली आहे तर 9 प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
गेल्या तीन वर्षांत विशेषकरून ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टरांच्या हाताखाली काही दिवस काम केल्यानंतर संबंधित आपण डॉक्टर असल्याचे सांगून ग्रामीण भागात रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांच्याकडून हायर अँटीबायोटिक्सचा उपयोग करण्यासह रुग्णांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. त्यामुळे ही बाब गंभीर स्वरुपाची बनली आहे. बोगस डॉक्टरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य खात्याने मार्गसूची जारी केली आहे. पहिल्या गुन्ह्याला 25 हजार रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्याला अडीच लाख रुपये दंड व एक वर्षाची शिक्षा, तिसऱ्यावेळी पुन्हा गुन्हा केल्यास 5 लाख रुपयांचा दंड आणि तीन वर्षांची शिक्षा ठोठावली जात आहे. तसेच नोंदणी नसताना बेकायदेशीररीत्या हॉस्पिटल चालविल्यास संबंधितांवर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यासह त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आरोग्य खात्याचे कार्यदर्शी पी. के. श्रीपती यांनी दिले आहेत.
आरोग्य खात्याकडून सातत्याने कारवाई...
2024-25 मध्ये सर्वाधिक गुलबर्गा जिल्ह्यात 111 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर कोलार 31, चामराजनगर 22, बळ्ळारी 15, बेंगळूर शहर 12, बागलकोट 8, बेळगाव 6, म्हैसूर 5, यादगिर 5, बेंगळूर ग्रामीण 4, चिक्कबळ्ळापूर 4, रामनगर 4, बिदर 2, चिक्कमंगळूर 2, दावणगेरे 2, उडुपी 2, चित्रदुर्ग 1, धारवाड 1, विजापूर 1 अशी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. आरोग्य खात्याकडून सातत्याने कारवाई सुरू असली तरीही अद्याप शहरासह ग्रामीण भागात बोगस डॉक्टर प्रॅक्टीस करत आहेत.