घरगुती कनेक्शनचा गैरवापर केल्यास कारवाई
हेस्कॉमच्या मुख्य अभियंत्यांचा इशारा
बेळगाव : घरगुती वीज मीटरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्यात येत आहे. अशी अनेक उदाहरणे समोर येत असल्याने हेस्कॉमच्या विजिलियन्स पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही घरगुती वीज कनेक्शनवर व्यावसायिक वापर होत असल्याचे निदर्शनास येताच त्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत देण्यात आला. शनिवारी रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉम उपविभाग 1 व 2 अंतर्गत तक्रार निवारण बैठक पार पडली. या बैठकीवेळी हेस्कॉमचे मुख्य अभियंता प्रवीणकुमार चिकाडे यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी ग्राहकांकडून वीज समस्या जाणून घेतल्या. सध्या हेस्कॉमकडून अनधिकृत वसाहतींमधील घरांना विजेचे कनेक्शन देणे बंद करण्यात आले आहे.
केईआरसीने आदेश बजावण्यापूर्वी ज्या ग्राहकांनी कनेक्शनसाठी अर्ज दाखल केले आहेत, त्यांना वेळेत कनेक्शन देण्याच्या सूचना करण्यात आल्या. अधिकृत कागदपत्र तसेच महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच यापुढे विजेचे कनेक्शन दिले जाणार आहे. त्यामुळे नियमावलीनुसारच यापुढे कनेक्शन दिले जाणार असल्याचे मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत वसाहतींमधील कनेक्शनला चाप बसल्यामुळे नवीन कनेक्शन घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना विजेचा भार वाढवून अथवा कमी करून घ्यावयाचा असेल त्यांची समस्या सोडवावी. मान्सून काहीच दिवसात दाखल होणार असल्याने त्यापूर्वी धोकादायक ठिकाणे शोधून दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीवकुमार सुखसारे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व हेस्कॉमचे पदाधिकारी उपस्थित होते.