इन्सुली तपासणी नाका येथे दारू वाहतुकीवर कारवाई
मयुर चराटकर
बांदा
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात दारूचे बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो यांचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी साडे आठच्या सुमारास केली.याबाबत मिळालेली माहिती अशी की गुरुवारी, २४ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास बांदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांनी इन्सुली तपासणी नाक्यावर सापळा रचला. यावेळी, गोवा ते कोल्हापूर जाणाऱ्या टेम्पोची (एम.एच. ०९/सीयू/५३८८) तपासणी केली असता, त्यात विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचे बॉक्स सापडले. यात व्हिस्की, व्होडका आणि रम असे विविध प्रकार होते. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक युवराज दिलीप कुरणे (वय-३९), अर्जुन राजेंद्र साळोखे (वय-२९) (दोघेही रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर), आणि सुशांत महाले (रा. तोरसे, गोवा) या तिघांना अटक केली आहे. परवाना नसताना ही दारू बेकायदेशीरपणे गोवा येथून कोल्हापूरला नेली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दारूचा साठा आणि टेम्पो असा एकूण ५,५०,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस नाईक विलास पांडुरंग भोगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहा पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, एएस आय दासू पवार, एएसआय पालकर, कॉन्स्टेबल प्रसाद पाटील आणि पोलीस नाईक विलास भोगले यांचा समावेश होता.