Solapur News : आरोपीला मोबाईल पुरवणे भोवले; कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निलंबित
मनोहर मामा प्रकरणात पोलीस नाईक निलंबित
कुर्डुवाडी -वादग्रस्त भोंदू बाबा मनोहर मामा भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे याला पोलीस कोठडीत असताना आपला मोबाईल फोन वापरण्यास दिल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बाळासाहेब दाढे यांना पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सोलापूर जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
रिअल इस्टेट एजंटला व्यवसायात प्रगतीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना कुर्डुवाडी पोलिसांनी पुणे येथील मांजरी भागातून अत्यंत गोपनीयरीत्या ताब्यात घेतले होते. तपासाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पातळीवरून कमालीची गोपनीयता पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या दोघांना कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील गोपनीय कक्षात ठेवण्यात आले होते.
आरोपींना गोपनीय कक्षात ठेवलेले असताना तिथे हजर असलेल्या पोलीस नाईक बाळासाहेब दाढे यांनी आरोपी विशाल वाघमारे याला मोबाईल देऊन त्याचे कोणाशी तरी संभाषण करून दिले. या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तपासाच्या कडक सूचना असतानाही आरोपीला अशा प्रकारे मदत करणे आणि आदेशाचा अवमान करणे, हा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दाढे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांची नेमणूक मुख्यालयात करण्यात आली आहे.
भक्तांचा राबता अन् पोलिसांचा अटकाव
आरोपी कोठडीत असताना त्यांच्या काही भक्तांनी त्यांना तंबाखू आणि मिनरल वॉटरच्या बाटल्या पुरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न वेळीच हाणून पाडला. दरम्यान, संबंधित आरोपी सध्या करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सात दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.या निलंबनाच्या कारवाईमुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस प्रशासनाने यातून कडक शिस्तीचा इशारा दिला आहे.
सदरचे प्रकरणात पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असून याबाबत मला काही माहिती देता येणार नाही.एक पोलिस नाईक मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश आले आहेत.