गोव्यात मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील बोटींवर कारवाई
सहा बोटी जप्त : स्थानिक मच्छीमारांनी केले कारवाईला सहकार्य
मडगाव : गोव्याच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या कर्नाटकातील सहा बोटींवर काल बुधवारी कारवाई करताना या बोटी जप्त करण्यात आल्या. बाणावली, वार्का, वेळसांव आणि कोलवा येथील मच्छीमारांनी एकत्र येऊन मत्स्य विभाग आणि किनारी पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. जप्त केलेल्या बोटी पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केल्या आहेत. कर्नाटकातील सुमारे 250 ते 300 बोटी गोव्याच्या जलक्षेत्रात प्रवेश करून किनाऱ्यालगत जाळी टाकून मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर मासळीमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतर कर्नाटकातील बोटी गोव्यात येऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी करतात. त्याला स्थानिक मच्छीमारांना तीव्र आक्षेप घेतला होता. आता पुन्हा एकदा कर्नाटकातील मालपे येथील या बोटी मासेमारी करण्यासाठी दाखल झाल्यानंतर स्थानिक मच्छीमारांनी एकत्र येऊन ही कारवाई केली.
कर्नाटकातील बोटी गोव्याच्या हद्दीत घुसून मासेमारी करत असल्याने येथील पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेला धोका निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्नाटकातील बोटी रोखण्यासाठी किनारी गस्त अधिक कडक करण्याची व क्षेत्राधिकार नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बाणावली येथील मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातून आलेल्या या बोटींनी मोठ्या प्रमाणात तारले, बांगडे, पापलेट इत्यादी मासळी पडकली होती. या बोटी एकाच वेळी 30 ते 40 टन मासळी पकडून नेत असल्याने स्थानिक मच्छीमारांना समुद्रात मासळी मिळणे कठीण होत असल्याचे सांगितले. सरकारने निदान आता तरी कडक धोरण राबवून कर्नाटकातील बोटींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.