धूळखात पार्किंग केलेल्या २९ वाहनांवर कारवाई
कराड :
कराड शहरातील अंतर्गत रस्त्यांवर महिनोमहिने काही चारचाकी वाहने पार्किंग केलेली आहेत. वाहनांवर प्रचंड धूळ साचली असून ही वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर कराड शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहरातील प्रत्येक पेठेत जाऊन पाहणी करत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तब्बल २९ वाहनांवर कारवाई करत दोन तासात २१ हजार ५०० रूपयांचा दंड केला असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी दिली.
शहरात सध्या वर्दळीच्या ठिकाणी पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. अंतर्गत अरूंद रस्त्यांचा अनेक वाहनधारक वापर करत असतात. मात्र रस्त्याकडेला अनेक बंद पडलेली किंवा सुरू असून उपयोगात येत नसलेली चारचाकी वाहने धूळखात लावली आहेत. या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या वारंवार तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेचे संदीप सूर्यवंशी यांनी दोन तासात कारवाई करण्यासाठी पथक तैनात केले. वाहतूक पोलीस मोहन जगताप, अरूण निकम, हवालदार सुनील पाटील, गोकुळ हादगे, वैभव यादव, नवनाथ पाटील यांनी शहरातील प्रत्येक पेठेतील अंतर्गत रस्त्यांवर फिरून पाहणी केली. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या धूळखात पडलेल्या २९ वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली. एकूण २१ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.