मुख्य सचिवांवर आठ दिवसांत कारवाई करावी : काँग्रेस
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना निवेदन सादर
पणजी : राज्याचे मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांनी हळदोणा येथील शेतजमिनीचे रूपांतर करून ती खरेदी केल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, याप्रकरणी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याची तयारी केली आहे. गोयल यांच्यावर आठ दिवसांच्या आत कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याकडे केली आहे. राज्यपाल पिल्लई यांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, हळदोणा मतदारसंघाचे आमदार अॅड. कार्लोस फेरेरा, श्रीनिवास खलप उपस्थित होते.
राज्यपालांच्या भेटीनंतर राजभवनच्या बाहेर पाटकर यांनी सांगितले की, सरकार राज्यातील शेतजमीन वाचवत असल्याचे खोटे सांगत असून या सरकारने मोठ्या प्रमाणात जमिनींचे रूपांतर करून या जमिनी विक्रीसाठी खुल्या केल्या आहेत. आता मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांनीच शेत जमिनीचे रूपांतर करून ती जमीन स्वत: खरेदी केली आहे. या रूपांतर समितीचे ते सदस्यही होते. यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला असल्याने त्यांना तात्काळ बडतर्फ करावे, ही बाब आम्ही राज्यपाल पिल्लई यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्यपाल येत्या आठ दिवसांत योग्य तो निर्णय घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. परंतु मुख्य सचिवांबाबत निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार असल्याचेही पाटकर म्हणाले.
भाजप सरकार घोटाळे करीत असून, राज्यातील जमिनी वाचविण्याबाबत कोणतेच प्रयत्न सरकारकडून होताना दिसत नाहीत. उलट प्रशासकीय अधिकारीही आता शेतजमिनीचे ऊपांतरण चुकीच्या पद्धतीने करत आहेत. सरकारकडून मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे, त्याप्रमाणेच आता राज्याचे मुख्य सचिव गोयल हेही यात मागे नसल्याचे सिद्ध होत आहे. गोयल यांनी 2.6 कोटी ऊपयांची जमीन खरेदी केली आहे. सर्वत्र जमीन विकणे सुरू असून यात राजकीय नेत्यांसह आता प्रशासकीय अधिकारीही मागे नाहीत, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.