For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार विद्यार्थी नेत्यांवर कारवाई शक्य

06:22 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार विद्यार्थी नेत्यांवर कारवाई शक्य
Advertisement

जेएनयुमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदली जाईल’ अशा अर्थाच्या घोषणा दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देणाऱ्या चार विद्यार्थी नेत्यांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर, तसेच या घोषणाबाजीत सहभागी असणाऱ्या इतरांवरही दिल्ली पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठानेच या विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार सादर केली असून पोलिसांनी कारवाई करावी, अशी सूचना केली आहे. यासंबंधीच्या पुराव्यांचा अभ्यास दिल्ली पोलिसांकडून आता केला जात आहे.

Advertisement

व्हिडिओग्राफीवरुन ओळख पटविण्यात आलेले हे सर्व चार विद्यार्थी नेते जेएनयु छात्र महासंघ या डाव्या विचारसरणीच्या संघटनेचे आहेत. त्यांची नावे दानिश अली (संयुक्त सचिव), अदिती मिश्रा (अध्यक्ष), गोपिका के. बाबू (उपाध्यक्ष) आणि सुनिल (महासचिव) अशी या चार विद्यार्थी नेत्यांची नावे आहेत. त्यांच्याखेरीज अन्य डाव्या विचारसरणीच्या संघटनांच्या अनेक विद्यार्थ्यांची नावे विद्यापीठाने पोलिसांना दिली आहेत. साद आझमी, पाकीझा खान, शुभम, कनिष्क शशांक आणि मोहम्मद इलाही यांचा या नावांमध्ये समावेश आहे. विद्यापीठात बेकायदेशीर घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांची हकालपट्ठी केली जाईल, असा इशारा विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने मंगळवारीच दिला होता. आता या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या नेत्यांवर पोलीस कारवाईची टांगती तलवारही असल्याचे दिसून येत आहे.

प्रकरण काय आहे...

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात मंगळवारी डाव्या विचारसरणीच्या संघटनेचे पदाधिकारी आणि काही विद्यार्थी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत अश्लाघ्य अशा स्वरुपाच्या घोषणा दिल्या होत्या. एका निषेध आंदोलनाचा भाग म्हणून ही घोषणाबाजी करण्यात आली, असे या संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनाला ‘ए नाईट ऑफ रेझिस्टन्स विथ गुरिल्ला धाबा’ असे नाव देण्यात आले होते. तथापि, हे आंदोलन दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या भीषण धार्मिक दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शर्जिल इमाम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याच्या निषेधार्थ करण्यात आले होते, असा अनेकांचा आरोप आहे. या घोषणाबाजीची संपूर्ण व्हिडीओग्राफी झालेली असून आता हे विद्यार्थी नेते आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले अन्य विद्यार्थी यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाढत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनानेही हे प्रकरण गंभीरपणे घेतले असून संबंधित विद्यार्थ्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

एफआयआर सादर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात अभद्र घोषणा देणारे विद्यार्थी नेते आणि विद्यार्थी यांच्या विरोधात एफआयआर सादर करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. हे आंदोलन 5 जानेवारी 2020 या दिवशी विद्यापीठात झालेल्या दंगलींच्या निषेधार्थ करण्यात येते, असे विद्यार्थी संघटनेचे म्हणणे आहे. ते खरे असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात अश्लाघ्य घोषणा देण्याचे काय कारण होते, असा प्रश्न विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने केला आहे. या प्रश्नाची उकल करण्यासाठी तपास होण्याची आवश्यकता असून विद्यापीठाने तशी पावले उचलली असल्याचे दिसून येते. लवकरच या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.