गुरुवारीही फटाके दुकानांवर कारवाई
मनपा आरोग्य विभागाकडून शंभर किलो फटाके जप्त : ग्रीन फटाके वापरण्याची सूचना
बेळगाव : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी दुसऱ्या दिवशीही प्रदूषणकारक फटाके विक्रेत्यांवर कारवाई केली. बुधवारी रात्री बाजारपेठेत 50 किलो फटाके जप्त करण्यात आले होते. गुरुवारी रविवार पेठजवळील एका दुकानातून 100 किलो फटाके ताब्यात घेण्यात आले. मनपा आयुक्त शुभा बी., आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी भातकांडे ब्रदर्स या फटाके दुकानात जाऊन तपासणी केली. न्यायालयाच्या आदेशावरून केवळ ग्रीन फटाक्यांची विक्री करण्यास व वापर करण्यास मुभा आहे. पर्यावरणाला घातक फटाके वापरण्यास बंदी आहे. मनपा अधिकाऱ्यांनी दुकानात तपासणी करून प्रदूषण वाढविणारे 100 किलो फटाके ताब्यात घेतले. दिवाळीत कोणत्या प्रकारचे फटाके फोडायचे, याविषयी 23 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना पाठविल्या आहेत. केवळ ग्रीन फटाक्यांची विक्री व वापराला परवानगी देण्यात आली आहे.
तुरमुरी कचरा डेपोला भेट
दरम्यान, मनपा आयुक्तांनी गुरुवारी सकाळी श्रीनगर येथील गोशाळेला भेट देऊन पाहणी केली. फटाके दुकानांच्या तपासणीनंतर तुरमुरी कचरा डेपोला भेट देऊन पाहणी केली. कचऱ्याच्या विल्हेवारीबद्दल अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.