For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहतूक नियम मोडल्याक्षणीच मोबाईलवर कारवाईचा मेसेज

11:02 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाहतूक नियम मोडल्याक्षणीच मोबाईलवर कारवाईचा मेसेज
Advertisement

अत्याधुनिक कॅमेरे बसवून ठेवणार वाहतुकीवर नजर

Advertisement

बेळगाव : वाहतूक नियम मोडणाऱ्यांना काही मिनिटांत त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्याची व्यवस्था अंमलात येत आहे. बेळगावसह कर्नाटकातील काही महानगरात ही व्यवस्था सुरू करण्यात येणार असून सिग्नल जंप असो किंवा विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा प्रकार असो, दंड भरण्यासाठी संबंधित वाहनचालकाच्या मोबाईलवर काही मिनिटांत मेसेज जाणार आहे. बेळगावसह म्हैसूर, बळ्ळारी, दावणगेरे, तुमकूर, शिवमोगा येथे ही व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. राज्य रस्ते सुरक्षा व वाहतूक विभागाने यासाठी तयारी केली असून कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या फोटोवरून संबंधितांना दंड भरण्यासाठी मेसेज पाठविण्यात येणार आहे. रस्ते सुरक्षा विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी ही माहिती दिली आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना त्वरित मोबाईलवर मेसेज पाठविल्यास त्यांनी केलेल्या चुकांची त्यांना माहिती मिळणार आहे. अशा चुका परत करू नये, याची जाणीवही त्यांना होणार आहे. त्यासाठीच हा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून वाहनमालकाच्या मोबाईलवर काही मिनिटांत त्यांनी केलेल्या चुकांच्या फोटोसह मेसेज पाठविण्यात येणार आहे. मूळ मालकाने जर वाहनाची विक्री केली असेल तर आरटीओ कार्यालयात सध्या ज्याचे नाव नोंद आहे, त्याच्या मोबाईलवर वाहतूक नियम मोडल्यासंबंधी माहिती जाणार आहे.

बेळगावात बेलट्रॅक योजनेंतर्गत 300 हून अधिक कॅमेरे

Advertisement

म्हैसूर येथे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. बेळगावात बेलट्रॅक योजनेंतर्गत 300 हून अधिक कॅमेरे बसविण्यात आले असून सध्या या कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनच वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. दंड भरण्यासाठी यापूर्वी घरी नोटिसा धाडल्या जात होत्या. आता वाहनचालकांच्या मोबाईलवरच मेसेज पाठविण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.