बांद्यात गोवा बनावटीच्या दारूसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी
बांदा
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी सकाळी महामार्गावरील बांदा येथील श्री समर्थ हॉटेल समोर गोवा बनावटीच्या दारुवर मोठी कारवाई करत, अवैध दारू वाहतूक करणारा सुमारे १६ लाख २९ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर महादेव केसरकर, (वय ३१, रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर),रुपेश शिरोडकर, (रा. गोवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सकाळी ०८:२५ वाजता बांदा येथील श्री समर्थ हॉटेल समोर सापळा रचला. यावेळी दारूची अवैध वाहतूक सुरू असलेल्या आयशर ट्रकवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत पोलिसांनी १५,००,०००/- (पंधरा लाख रुपये) किमतीचा एक आयशर ट्रक आणि ₹ १,२९,१२०/- (एक लाख एकोणतीस हजार एकशे वीस रुपये) किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत ₹ १६,२९,१२०/- (सोळा लाख एकोणतीस हजार एकशे वीस रुपये) इतकी आहे.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई), ८१, आणि ८३ प्रमाणे बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग, नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा आणि आशिष जामदार यांचा समावेश होता. सिंधुदुर्ग पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.