For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांडपाणी जोडणी नसल्याने मडगावात हॉटेल्सवर कारवाई

12:57 PM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांडपाणी जोडणी नसल्याने  मडगावात हॉटेल्सवर कारवाई
Advertisement

जोडणीसाठी अर्ज करूनही कार्यवाही होत असल्याने नाराजी

Advertisement

मडगाव : मडगाव पालिका क्षेत्रातील ज्या हॉटेल्सनी सांडपाणी जोडणी घेतलेली नाही, त्या हॉटेल्सवर कारवाई केली जात आहे. काही हॉटेलमालकांनी सांडपाणी जोडणीसाठी अर्ज करून पाच वर्षे झाली आहेत परंतु, त्यांना अद्याप जोडण्या दिलेल्या नाहीत. यात हॉटेलमालकांचा काय दोष असा सवालही हॉटेल मालकांनी उपस्थित केला आहे. सरकारच्या खात्यात समन्वय नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा दावा हॉटेलमालकांनी केला आहे. मडगाव पालिका क्षेत्रात काही ठिकाणी सांडपाणी वाहिन्यांचे काम पूर्ण झालेले नाही. सांडपाणी वाहिन्यांचे काम सुरू आहे. तरीही काही आस्थापनांना सांडपाण्यासाठी जोडण्या दिलेल्या आहेत. काही ठिकाणी जोडण्या देण्याचे बाकी आहे. अशा पार्श्वभूमीवर काल मंगळवारी प्रत्यक्ष कारवाई हाती घेतल्याने हॉटेलमालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारी खात्यांत समन्वय नाही

Advertisement

सांडपाणी जोडण्यासाठी अर्ज करून पाच वर्षे होत आली तरी जोडण्या मिळत नाही. यात हॉटेलमालकांचा काहीच दोष नाही. सरकारच्या खात्यांमध्ये समन्वय नसल्याने असे प्रकार घडत असल्याची प्रतिक्रिया सुदेश भिंसे यांनी व्यक्त केली.  जोडण्या का दिल्या जात नाहीत, याची चौकशी अगोदर जिल्हाधिकारी पातळीवर व्हायला पाहिजे होती. तेव्हाच सरकारी यंत्रणेला सत्यपरिस्थिती कळली असती. मात्र, तसे काही न करता प्रत्यक्ष कारवाई केल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सांडपाणी जाते साळ नदीत

मडगावातील सांडपाणी नाले-गटारांतून वाहत नावेलीतील शेतांमध्ये जाऊन साळ नदीला प्रदूषित करत आहे. या कारणास्तव उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाकडून पालिकेला आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. मडगाव पालिका मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनीही काही दिवसांपूर्वीच प्रदूषण करणाऱ्या आस्थापनांना नोटिसा पाठवत सांडपाणी जोडणी घेण्याचे आवाहन केले होते.

मामलेदारांच्या आदेशानुसार कारवाई

यानंतर मडगाव परिसरातील काही हॉटेल्स सासष्टी मामलेदारांकडून सील करण्यात आली. मंगळवारी सकाळी सासष्टीचे मामलेदार, तलाठी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणात मडगाव भागातील 19 पैकी तीन हॉटेल्सवर कारवाई करुन ती सील करण्याची कार्यवाही सुरू केली. मामलेदार भिकू गावस यांनी जल प्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार याबाबतचा आदेश जारी केलेला होता.

नोटिसा देण्यात आलेली आस्थापने

मडगावातील फुर्तादो बार आणि रेस्टॉरंट-खारेबांद, मडगाव पॅफे, बॉम्बे पॅफे, सगूण हॉटेल, स्टार हॉटेल, गोवा गेस्ट हाऊस, टोनी कोल्डड्रिंक्स, अमाचे दुकान, शेख बेपारी बीफ शॉप-गांधी मार्केट, हिमालय आईस्क्रीम पार्लर-कालकोंडा, स्टार चिकन सेंटर-गांधी मार्केट, कास्मिरो बार-मालभाट, लक्ष्मी हॉटेल-मालभाट, ए-1 फास्ट फूड-फ्लायओव्हर ब्रिजनजिक, ब्रीझा हॉटेल, गोवन बार-कालकोंडा, भारत पॅफे, तंदूर रेस्टॉरंट, व बीफ सेंटर-गांधी मार्केट या दुकानांना नोटीस देण्यात आलेली आहे. काही हॉटेल व दुकानमालक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरील निर्णयावर नाराज असून त्यांनी वरील आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. सरकारी खात्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे याचा फटका दुकानदारांना बसत असल्याने यासंदर्भात हॉटेल व दुकानमालक जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांची भेट घेणार आहेत.

Advertisement
Tags :

.