गैरप्रकाराला थारा देणाऱ्या कॅफेंवर कारवाई
कराड :
कॅफेच्या नावाखाली अश्लिल चाळे करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या कॅफेंवर कराड उपविभागीय पोलीस पथकाने शुक्रवारी ‘सरप्राईज’ कारवाईचा बडगा उगारला. पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चार स्वतंत्र पथके चार बाजुला पाठवत अचानक केलेल्या कारवाईत अनेक जोडपी पोलिसांच्या कारवाईत अडकली. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून वारंवार सूचना देऊनही प्रेमीयुगुलांना पॅफेत आडोशाची जागा करून ठेवणाऱ्या पॅफे चालक व मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही वेगाने सुरू होती असे समजते.
कराड, मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी आडोशाला तर सेवारस्त्यालगत पॅफेंची संख्या वाढली असून या पॅफेंमध्ये प्रेमीयुगूले तासन् तास अश्लिल चाळे करत बसलेली असतात. यातून एखादा गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक यापूर्वी यातून असे काही गंभीर गुन्हे घडले आहेत. यासंदर्भात पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी साध्या वेशातील पोलिसांमार्फत खात्री करून एकाचवेळी चार पथकांकडून कारवाई करण्याची व्युहरचना आखली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, साक्षात्कार पाटील यांच्यासह संतोष सपाटे, आसिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयूर देशमुख, अनिकेत पवार, महिला पोलीस कांचन हिरवे, ज्योती काटू, वैशाली यादव, धनश्री माने यांच्यासह या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली चार पथके तयार करून ती पॅफेच्या परिसरात अचानक पाठवण्यात आली.
एकाचवेळी कारवाई झाल्याने पॅफेचालकांची चांगलीच पाचावर धारण बसली. पॅफेच्या नावाखाली सुरू असलेले अश्लिल उद्योगास प्रोत्साहन देण्याचे प्रकार उघडकीस आले. पोलीस उपअधिक्षक ठाकूर यांनी पॅफे चालक मालकांसह तिथे असलेल्या जोडप्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पॅफेत आढळलेल्या जोडप्यांवर मुंबई कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली असून पॅफे चालक मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.