विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
आरोपीतर्फे ॲड. स्वरूप पई यांनी पाहिले काम
मालवण । प्रतिनिधी
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी गोळवण गावठाणवाडी येथील रवळनाथ मंदिरामागील जंगल भागात घातलेल्या छाप्यावेळी विनापरवाना ठासणीची बंदूक बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 (1) (अ) प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील आरोपी शरद नारायण मांजरेकर वय 35 वर्षे राह. गोळवण ता. मालवण याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. के. फकीह साहेब यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले.दिनांक 22/03/2019 रोजी सिंधुदुर्गनगरी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेस प्राप्त झालेल्या खबरीवरुन पोलिसांनी गोळवण येथे छापा घातला होता. त्यावेळी शरद नारायण मांजरेकर हा रवळनाथ मंदिराच्या मागील जंगल भागातून ठासणीची बंदूक घेऊन जात असताना दिसून आला. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन परवान्याची विचारणा केली असता तसा परवाना नसल्याचे संशयिताने सांगितल्यामुळे शस्त्र जप्ती करुन पोलिसांनी मालवण पोलिस ठाण्यात दि. 22/03/2019 रोजी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 (1) (अ) अन्वये विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगल्याबद्दल संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मालवण पोलिसांनी तपासचाम करून व मे. जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग यांची परवानगी प्राप्त करुन आरोपीविरुद्ध मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोप दाखल केलेले होते.सुनावणी दरम्यान सरकारपक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले.खटल्याच्या सुनावणीअंती फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे केलेला बचावाचा युक्तीवाद ग्राह्य धरून मे. न्यायालयाने आरोपीची खटल्यातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.