48 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यावर निर्दोष मुक्तता
ओक्लाहोमा : 1974 मध्ये अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये दोन चोरांनी मद्यविक्री दुकानात शिरून चोरी केली होती. त्यांनी केलेल्या गोळीबरात कॅरोलिसन सू रोजर्स नावाचा व्यक्ती मारला गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी ग्लिन सिमंस, डॉन रॉबर्ट्स, लियोनार्ड पॅटरसन आणि डेलबर्ट पॅटरसन यांना अटक केली होती. एका महिला प्रत्यक्षदर्शीच्या साक्षीनंतर ग्लिन आणि डॉन रॉबर्ट्स यांना ताब्यात घेण्यात आले होते. दोघांवरही खटला चालला होता आणि ओक्लाहोमा न्यायालयाने त्यांना मृत्युदंड ठोठावला होता. 1975 मध्ये मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करण्यात आली होती. तर 2008 मध्ये रॉबर्ट्सची पॅरोलवर मुक्तता झाली होती. परंतु ग्लिन कैदेत राहिला होता. या पूर्ण प्रकरणी 48 वर्षांनी आता ओक्लाहोमाच्या न्यायालयाने ग्लिन यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सादर करण्यात आलेले पुरावे कुणालाही शिक्षा ठोठावण्यासाठी पुरेसे नाहीत. यापूर्वी कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय शिक्षा सुनावण्यात आली. तर साक्षीदार असलेली महिला घटनास्थळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती असे न्यायालयाने म्हटले आहे. ओक्लाहोमामध्ये अशा प्रकरणी संबंधित व्यक्तीला 1.46 कोटी रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते.