धारगळ येथे कॉलेज विद्यार्थ्यावर अॅसिड हल्ला
दोडामार्ग येथील नीलेश देसाईच्या आवळल्या मुसक्या : प्रेम प्रकरणातून घडलेला प्रकार, हल्लेखोर मुलीचा वडिल
पेडणे : धारगळ येथे ऋषभ उमेश शेट्यो या कॉलेज विद्यार्थ्यावर अॅसिड फेकल्या प्रकरणी सिंधुदुर्गातील कळणे दोडामार्ग येथील नीलेश गजानन देसाई याला पेडणे पोलिसांनी अटक करुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. देसाई यांनी आपला गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. काल सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास धारगळ येथे ऋषभ उमेश शेट्यो हा विद्यार्थी म्हापसा येथील महाविद्यालयात जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबला होता, त्याचवेळी हा प्रकार घडला.
बादलीभर फेकले अॅसिड
ज्या बस स्टॉपवर ऋषभ रोज थांबतो, त्याच्या बाजूलाच नीलेश देसाई हा सकाळपासून ऋषभची वाट पाहत होता. नीलेशने येताना आपल्या दुचाकीवरुन बादलीभर अॅसिडमिश्रित द्रव्य आणले होते. ऋषभ बससाठी स्टॉपकडे आला असता दबा धरून बसलेल्या नीलेश देसाई याने त्याच्यावर ते बादलीभर अॅसिड सरळ फेकले. या घटनेमुळे धारगळसह संपूर्ण गोव्यात खळबळ माजली.
वडिलांनी नेले हॉस्पिटलमध्ये
अचानक झालेल्या या हल्ल्याने ऋषभ शेट्योला काय झाले ते काहीच कळले नाही. आपल्या बचावासाठी तो सुमारे 100 मीटर राष्ट्रीय महामार्गावरुन धावत गेला. त्याला धावत असताना पाहून कुणीतरी त्याच्या वडिलांना फोन केला. त्याचे वडिल उमेश शेट्यो हे पोलिस आहेत. त्याचे वडील लगेच घटनास्थळी पोहोचले. ऋषभने आपल्यावर कुणीतली अॅसिड फेकल्याचे वडिलांना सांगितले. वडिलांनी जखमी अवस्थेतील ऋषभला म्हापसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये नेले.
ऋषभचे नीलेशच्या मुलीशी प्रेम?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृषभ उमेश शेट्यो याचे नीलेश देसाई यांच्या मुलीशी प्रेम प्रकरण मागच्या दोन वर्षापासून सुरू होते. सदर मुलगी मामाच्या घरी पेडणे तालुक्यात राहत होती. ऋषभ शेट्यो व सदर मुलगी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याने त्यांची मैत्री वाढली होती.
मे महिन्यात मुलीचा मृत्यू
मागच्या मे महिन्यामध्ये सदर मुलीचा मृत्यू झाला होता. या मृत्यूस ऋषभ कारणीभूत असल्याचा संशय मनात बाळगून तिचे वडिल नीलेश देसाई यांनी हा अॅसिड हल्ला केल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे.
बॅग व पुस्तक गेले विरघळून
अॅसिड हल्ला एवढा तीव्र होता की ऋषभच्या कॉलेजची पुस्तके आणि बॅग विरगळून रस्त्यावर पडलेले पोलिसांना सापडले आहे. ऋषभच्या चेहऱ्यावर नाक, कान, गाल तसेच मानेवरही जखम झाली आहे. त्याची प्रकृती चिंताजनक नसल्याची माहिती रात्री देण्यात आली.
नीलेशच्या आवळल्या मुसक्या
घटनेचा पंचनामा करताना पेडणे पोलिसांना समजले की संशयित नीलेश देसाई हा म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये कामाला आहे. पोलिसांनी त्याला तेथूनच अटक केली. याकामी म्हापसा पोलिस, मोपा पोलिस व मांद्रे पोलिसांचे सहकार्य पेडणे पोलिसांनी घेतले. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे, मोपा निरीक्षक नारायण चिमुलकर, ठसेतज्ञ, श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले होते. मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर, धारगळचे माजी सरपंच सतीश धुमाळ उपस्थित होते. घटनेची माहिती पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना मिळताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी युवकाची, नातेवाईकांची भेट घेतली. जखमी ऋषभ शेट्योची प्रकृती सुधारत असल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता म्हणाले.
पेडणे आमदारांनी घेतली भेट
पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना धारगळ येथील या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने म्हापसा हॉस्पिटलमध्ये ऋषभ उमेश शेट्यो यांची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबीयांकडेही चर्चा केली. पोलिसांनी संशयिताला अटक केल्यानंतर पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे पेडणे पोलिसस्थानकावर गेले आणि संशयिताला त्वरित अटक केल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा : कोरगावकर
मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन हे प्रकरण नक्की काय आहे याची विचारपूस केल्यानंतर त्यांनी पेडणे पोलिसस्थानकाला भेट दिली. राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सरकारने अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. या अॅसिड हल्ल्याचा गोवा प्रदेश महिला काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा हल्ला केवळ अमानवी कृत्य नसून, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पूर्णपणे कोलमडलेल्या परिस्थितीचे भयावह चित्र आहे, असे मत महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी व्यक्त केले.
पेडणे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. उपनिरीक्षक वांयगणकर, उपनिरीक्षक प्रवीण सीमेपुऊषकर, उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर, उपनिरीक्षक तुकाराम चोडणकर, उपनिरीक्षक साहिल नाईक तसेच तिमराज म्हामल, सचिन हळर्णकर, सागर खोर्जुवेकर, कृष्णा वेळीप, गुऊदास धुरी, विनायक परब, रोहन केपकर, शशांक साकळकर, प्रज्योत मयेकर यांनी तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी या शोध मोहिमेत भाग घेऊन या प्रकरणाच छडा लावला. उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पेडणे पोलिस करत आहेत.