For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर

06:30 AM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
अच्युता  माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर
Advertisement

 अध्याय पहिला

Advertisement

संजय म्हणाला, पांडवांच्याकडून सर्वप्रथम श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख सहजलीलेने वाजवला. त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणे घुमत राहिला. नंतर अर्जुनाने अतिगंभीर आवाजात आपला देवदत्त नावाचा शंख वाजवला. इतक्यात आवेश चढलेल्या भीमाने आपला पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवला, राजा युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक शंख वाजवला. नंतर महाधनुर्धर काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टधुम्न, विराट, शत्रुकडून कधीही पराभूत न झालेला सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, महाबाहु अभिमन्यु इत्यादिकांनी, आपापले शंख वाजवले. त्या मोठ्या घोषाच्या दणाक्याने शेष व कूर्म हे एकदम गोंधळून गेले आणि त्यांनी धरलेले पृथ्वीचे ओझे टाकून देण्याच्या बेतात ते आले. त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले. मेरु व मंदार पर्वत मागेपुढे झोके खाऊ लागले. समुद्राच्या लाटा कैलासापर्यंत उसळल्या. पुढील श्लोकात संजय म्हणाला, पृथ्वी व आकाशही दणाणून सोडणाऱ्या त्या शंखाच्या तुंबळ घोषाने कौरवांची हृदये विदीर्ण केली.

 त्या घोषे कौरवांची तो हृदये चि विदारली । भरूनि भूमि आकाश गाजला तो भयंकर ।। 19 ।।

Advertisement

 श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजयाने राजाला असे सांगितले की, शंखाच्या प्रचंड घोषाने हल्लकल्लोळ माजला. जमीन उलथून पडते की, काय असे वाटू लागले. आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच पडण्याची शक्यता निर्माण झाली. सृष्टी चालली रे चालली, देव निराधार झाले, अशी ब्रह्मलोकात एकच ओरड झाली. दिवसाच सूर्य थांबला व प्रलयकाळ सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला. ते पाहून परमात्मा विस्मित झाला व मनात म्हणाला, न जाणो, सृष्टीचा अंत होईल. तो चुकवावा म्हणून त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला. त्यामुळे जग सावरले. नाहीतर ज्यावेळी कृष्णादिकांनी आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळीच युगांत होण्याची वेळ आली होती. तो घोष तर शांत झाला पण त्याच्या प्रतिध्वनीने कौरवांच्या सैन्याची दाणादाण उडाली. हत्तींच्या कळपाची सिंह सहजलीलेने जशी पांगापांग करतो, तशी कौरवांची अंत:करणे त्या प्रतिध्वनीने भेदून टाकली. तो दुमदुमणारा प्रतिध्वनी जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभ्याउभ्याच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. ते एकमेकांना ‘अरे सावध रे सावध’ असे म्हणू लागले.  पुढील श्लोकात संजय म्हणाला, कौरवपक्षीय सैनिक पुन्हा व्यवस्थित उभे राहिले. आता युद्धाला सुरवात होणार तो आपले धनुष्य उचलून पांडुपुत्र अर्जुन म्हणाला, कृष्णा दोन्ही सैन्यामध्ये माझा रथ उभा कर.

 मग नीट पुन्हा सारे कौरव उभे राहिले । चालणार पुढे शस्त्रs इतुक्यात कपिध्वज । हाती धनुष्य घेउनि बोले कृष्णास वाक्य हे ।।20।।

 श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजयाने धृतराष्ट्राला असे सांगितले की, कौरव सैन्यात पराक्रमाने व मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला सावरले. मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले व दुप्पट जोराने उसळले. त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले. त्यावेळी प्रलयकाली मेघ ज्याप्रमाणे पाण्याचा अनिवार वर्षाव करतात, त्याप्रमाणे धनुष्य धारण करणारे योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले. अर्जुनाला ते पाहून मनात संतोष वाटला आणि मग उत्सुकतेने त्याने सैन्याकडे नजर फेकली. तेव्हा युद्धाला तयार असलेले कौरव त्याला दिसले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले आणि म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर.

क्रमश:

Advertisement
Tags :

.