प्लास्टिक वापर शून्य करूया : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियान
आचरा प्रतिनिधी (फोटो परेश सावंत )
प्लास्टिक वापर दैनंदिन जीवनात कमी झाला पाहिजे. प्लास्टिक पिशव्या, बॉटल सर्वत्र दिसून येतात. विघटन होत नसल्याने पर्यावरणावर या प्लास्टिकचा ताण वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी प्रत्येकाने प्लास्टिक वापर टाळल्यास ती कृती मोलाची ठरेल. यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन वापरातील प्लास्टिक वापर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्नाशील राहूया. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आचरा येथे बोलताना व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने मालवणसह किनारी भागात मोठया प्रमाणात पर्यटक येतात. त्यांच्या माध्यमातूनही प्लास्टिक कचरा वाढणार नाही याबाबतही जनजागृती महत्वाची आहे. प्रशासन स्तरावरूनही आवश्यक उपाययोजना केल्या जात असून त्यात अधिक व्यापकता आणली जाईल. मात्र प्लास्टिक कचरा मुक्ती साठी सर्वांचे योगदान आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे. असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त राष्ट्रीय किनारा अभियान राबवले जात आहे. या अनुषंगाने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम अंतर्गत मालवण तालुक्यातील आचरा ते देवबाग समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आचरा समुद्र किनारी करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सहभागी होत जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल आदी कचरा उचल प्राधान्याने केली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, परिसर स्वच्छता, ग्राम स्वच्छता याबाबत प्रत्येकाने जागरुक असणे आवश्यक आहे. वाढती प्लास्टिक कचरा समस्यां आपल्याच आरोग्यासाठी हानिकारक आहे याचा विचार आपण सर्वांनी करूया. प्लासिक वापर शून्य करूया. असेही आवाहन त्यांनी केले.दरम्यान, वाढत्या कचरा समस्या निराकरणासाठी ग्रामपंचायतींवर पर्यटन हंगामात ताण वाढतो. यासाठी योग्य नियोजन व उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी मालवण तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, गटशिक्षणाधिकारी संजय माने, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आचरा ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, पंचायत समिती विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महसूल कर्मचारी, आचरा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, बचत गट प्रतिनिधी, शालेय विध्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. आचरा समुद्र किनारी राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, आचरा ग्रामपंचायत, शालेय विध्यार्थी,शिक्षक, ग्रामस्थ, सामाजिक संस्था या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी मोठया प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.