सिद्धीचा उपयोग लोककल्याणकारी कार्यासाठी होतो!
अध्याय सातवा
षोडशोपचारे केलेली पूजा, मिळेल ते साहित्य घेऊन केलेली पूजा अथवा मानसपूजा ह्या पूजेच्या तिन्ही प्रकारांपैकी कोणत्याही पद्धतीने केलेली पूजा बाप्पांना आवडते. ते भक्तावर प्रसन्न होऊन त्याचे मनोरथ पुरवतात. मग तो कुठल्याही आश्रमातील असो. जे निरपेक्षतेने भक्ती करतात त्यांना ते सिद्धी प्रदान करतात, असे सांगणारा ब्रह्मचारी गृहस्थो वा वानप्रस्थो यतिश्च यऽ । एकां पूजां प्रकुर्वाणोऽ प्यन्यो वा सिद्धिमृच्छति ।। 11 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत.
भक्तांची मागणी पुरवण्यामागे बाप्पांची तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे मागितलेली गोष्ट भक्ताच्या हिताची असते आणि दुसरे कारण म्हणजे भक्ताला पाहिजे ते मिळाले की, भक्ताचे बाप्पांवरील प्रेम आणखीन वाढते आणि बाप्पा तर भक्तांच्या प्रेमाचे भुकेले आहेत. तिसरे कारण म्हणजे भक्ताने त्याच्या दृष्टीने कितीही महत्त्वाची मागणी केलेली असली तरी ती लौकिकातील म्हणजे प्रपंचाला उपयोगी असलेली मागणी असल्याने, मागितलेली वस्तू कधी ना कधीतरी नष्ट होणारी आहे, हे त्यांच्या लक्षात यावे आणि कायमचे टिकणारे असे काही मागण्याची बुद्धी त्यांना व्हावी. या तीन कारणांसाठी बाप्पा भक्तांच्या हिताच्या कोणत्याही मागण्या पुरवायला तयार असतात.
त्याचबरोबर बाप्पांच्या भक्तांकडून दोन अपेक्षा असतात. पहिली अपेक्षा अशी की, एक ना एक दिवस भक्तांना बाप्पांच्या अफाट सामर्थ्याची कल्पना येईल आणि आपली मागणी बाप्पांच्या दृष्टीने अगदीच किरकोळ आहे, हे लक्षात येईल. बाप्पांना भक्तांकडून दुसरी अपेक्षा अशी असते की, त्याने मागितलेली वस्तू नश्वर आहे हेही भक्ताच्या लक्षात यावे. बाप्पा हे भक्ताच्या लक्षात येण्याच्या दिवसाची वाट पाहत असतात. कारण असे झाले की, त्यादिवशी भक्ताच्या बाप्पांकडे काही मागण्याची इच्छाच संपलेली असते आणि असे भक्त बाप्पांना अतिशय प्रिय असतात. अशा भक्तांना ‘भगवान देता है, तो छप्पर फाडके देता है।’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय येतो. कसा ते सांगतो, आपण पाहत असलेल्या श्लोकात बाप्पा म्हणतायत; जे निरिच्छ झालेले आहेत त्यांनी कोणत्याही एका प्रकाराने माझी पूजा केली तर मी त्यांना सिद्धी प्रदान करतो. जो भक्त बाप्पांकडे काहीही न मागता त्यांची पुजायुक्त भक्ती करतात त्यांचे बाप्पांना अतिशय अप्रूप असते. त्याच्या प्रेमाखातर ते काहीही करायला तयार असतात. म्हणून त्याने न मागताच ते त्याला सिद्धी प्रदान करतात. या सिद्धी म्हणजे ईश्वरी सामर्थ्य असते. त्यांचा उपयोग करून भक्त मोठमोठी लोककल्याणकारी कार्य करू शकतो.
निरपेक्ष भक्ताला बाप्पा अष्टसिद्धी प्रदान करतात. त्याला सिद्धी प्रदान करण्यामागे बाप्पांचा उद्देश असा असतो की, त्याने त्या सिद्धींचा उपयोग करून लोककल्याणकारी कार्ये करावीत. ईश्वराने सगुण रूपात प्रकट होऊन किंवा निरनिराळ्या संत सद्गुऊंच्या रूपात प्रकट होऊन अनेक लीला केलेल्या आहेत, हे आपल्याला माहीत आहेच. या लीला ईश्वराला प्राप्त असलेल्या सिद्धींमुळे शक्य होतात. अशा लीला करणे हे बाप्पांनी प्रदान केलेल्या सिद्धींमुळे भक्तालाही शक्य होते. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्वे या आठ सिद्धी आहेत. असामान्य कौशल्य, असामान्य क्षमता अर्जित केली की, त्याला सिद्धी असे म्हणतात. उदाहरणादाखल पाहावयाचे झाल्यास दिव्यदृष्टी, एकाच वेळेस दोन जागी असणे, आपल्या आकारास सूक्ष्म अथवा मोठे करणे इ. पातंजल योगशास्त्रात - जन्माने, औषधिद्वारा, मत्राद्वारा, तपाने आणि समाधीने सिद्धींची प्राप्ती केली जाते, असे म्हटले आहे.
क्रमश: