आचार्य सत्येंद्र दास रुग्णालयात दाखल
अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी : प्रकृती चिंताजनक; भक्तांकडून प्रार्थना
► वृत्तसंस्था/ लखनौ
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची प्रकृती रविवारी मध्यरात्रीनंतर अचानक बिघडली. त्यांना लखनौमधील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी मंदिरातील पुजारी आणि भक्तांनी हवन आणि प्रार्थना सुरू केल्या आहेत.
रविवारी रात्री उशिरा आचार्य सत्येंद्र दास यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना प्रथम अयोध्येतील सिटी न्यूरो केअर रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला लखनौला रेफर करण्याचा निर्णय घेतला. त्यांना रुग्णवाहिकेने लखनौला आणण्यात आले. जिथे त्यांना पीजीआयच्या न्यूरोलॉजी विभागाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. इस्पितळामध्ये आचार्य सत्येंद्र दास यांच्यासोबत रामजन्मभूमी मंदिराचे सहाय्यक पुजारी प्रदीप दास उपस्थित आहेत.
राममंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांची प्रकृती अत्यवस्थ असली तरी मंदिरातील पूजा आणि इतर धार्मिक विधी पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. मंदिरातील सर्व कामे सहाय्यक पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरळीतपणे पार पडत आहेत, असे रामजन्मभूमी मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.