For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

'सुरक्षा राखी’तून आचरा पोलिसांचा सुरक्षित प्रवासाचा संदेश; विना हेल्मेट दुचाकीस्वारांना राखी बांधून हेल्मेट वापराबाबत जनजागृती

 सुरक्षा राखी’तून आचरा पोलिसांचा सुरक्षित प्रवासाचा संदेश  विना हेल्मेट दुचाकीस्वारांना राखी बांधून हेल्मेट वापराबाबत जनजागृती
Advertisement

आचरा / प्रतिनिधी : रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनाला रस्ते सुरक्षेशी जोडत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यात ‘सुरक्षा राखी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आचरा पोलिसांनी वाहनचालकांमध्ये हेल्मेट आणि सीटबेल्ट वापराबाबत जनजागृती करत सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला.

Advertisement

रक्षाबंधनाच्या दिवशी आचरा तिठा येथे हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलीस भगिनींनी ‘सुरक्षा राखी’ बांधून हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले. राखीच्या माध्यमातून वाहनचालकांना त्यांच्या सुरक्षिततेची तसेच कुटुंबीयांच्या काळजीची जाणीव करून देण्यात आली.

Advertisement

‘घरी आपली वाट पाहणारे आहेत’

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी वाहनचालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येक वाहनचालकाने दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. आपल्या घरी आपली बहीण, कुटुंबीय आणि नातेवाईक आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाला आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, वाहतूक पोलीस मिलिंद परब, विशाल वैजल, श्रीनाथ जाधव, पांडुरंग पारधी, तन्वी माणगावकर, अमित हळदणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि होमगार्ड उपस्थित होते.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून ‘राखीचे बंधन म्हणजे सुरक्षिततेची जबाबदारी’ असा संदेश वाहनचालकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

Advertisement
Tags :

.