For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एसटी बसमधून मच्छी वाहतुकीला परवानगी द्या; आचरा ग्रामपंचायतीचे महामंडळाला निवेदन

02:01 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसटी बसमधून मच्छी वाहतुकीला परवानगी द्या  आचरा ग्रामपंचायतीचे महामंडळाला निवेदन
Advertisement
आचरा प्रतिनिधी : आचरा बंदर परिसरातील मच्छी विक्रेत्या महिलांना कणकवली येथे मच्छी विक्रीसाठी नेण्याकरिता एसटी प्रवासी बसमधून मच्छी वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कणकवली आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

आचरा बंदर परिसरातील अनेक महिला मच्छी विक्रीच्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, आचरा येथून कणकवली बाजारपेठेत मच्छी नेण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मच्छी हा नाशवंत पदार्थ असल्याने तो वेळेत बाजारपेठेत पोहोचवणे आवश्यक असते. वाहतुकीची सोय नसल्यामुळे विक्रेत्यांच्या दैनंदिन व्यवसायावर परिणाम होत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर आचरा ग्रामपंचायतीने एसटी महामंडळाकडे निवेदन सादर करून मच्छी वाहतुकीस परवानगी देण्याची मागणी केली आहे. बसमधून मच्छी वाहतूक करताना प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही, स्वच्छता राखली जाईल आणि मच्छी सुरक्षितपणे वाहून नेली जाईल, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याची तयारी निवेदनातून दर्शविण्यात आली आहे. आवश्यक अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मागणी मान्य न झाल्यास आंदोलन

मच्छी विक्रेत्या महिलांच्या रोजगाराचा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून एसटी महामंडळाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका ग्रामपंचायतीने मांडली आहे. मात्र, मागणी मान्य न झाल्यास मच्छी विक्रेत्यांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे आचरा परिसरातील मच्छी विक्रेत्या महिला आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

या वेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, उमेश सावंत तसेच मच्छी विक्रेत्या महिला विशाखा खवणेकर, छाया पराडकर, गौरी सारंग, दीक्षा जोशी, सुवर्णा पराडकर, विमल बापर्डेकर, सुचिता तोडणकर, मीनल धुरी आणि माधुरी सारंग उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :

.