For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतचोरीसाठी आरोपींकडून कॉल सेंटर प्रारंभ?

11:25 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
मतचोरीसाठी आरोपींकडून कॉल सेंटर प्रारंभ
Advertisement

आळंदमधील प्रकरणासंबंधी एसआयटीकडून तपासाला वेग : 75 जणांच्या मोबाईल क्रमांकांचा दुरुपयोग

Advertisement

बेंगळूर : कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद विधानसभा मतदारसंघातील कथित मतचोरी प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. आरोप असलेले अक्रम, अश्पाक, नदीम आणि मुश्ताक यांनी मतचोरीसाठीच कॉल सेंटर सुरू केले होते. या केंद्रातील पाच संगणकांचा वापर करून 6,018 अर्ज स्वीकारले होते. या चार जणांमध्ये एकजण ऑनलाईन राजकीय सर्व्हेयर/मॅनिप्युलेटर, एकजण डेटा ऑपरेटर तर अन्य दोघे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात निष्णात होते. आरोपींनी 6,018 अर्जांसाठी लॉगइन आयडी तयार करण्यासाठी दुर्बल वर्गातील 75 जणांच्या मोबाईल क्रमांकांचा वापर केल्याचे आढळून आले आहे.

आळंदमधील कथित मतचोरी प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. ओटीपीद्वारे लॉगइन आयडी तयार करण्यात आला. आरोपींनी 75 मोबाईल क्रमांक कसे मिळविले?, मोबाईल क्रमांक हॅक झाले होते का? याचा तपास सुरू आहे. याचा छडा लावण्यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी अक्रम, नदीम आणि मुश्ताक यांची चौकशी केली आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी एसआयटीचे एक पथक दुबईला जाण्याच्या तयारीत आहे. मतचोरी प्रकरणात वरील चार आरोपींनी महत्त्वाची भूमिका बजावली. अर्ज सादर करण्यासाठी एका डेटा ऑपरेटरची मदत घेण्यात आली.

Advertisement

त्यानंतर त्याने इतर चार जणांची मदत घेतली. हे चौघे बेरोजगार असून 25 ते 30 वयोगटातील आहेत. चारही आरोपींना एका अर्जामागे 80 रु. देण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. 2023 च्या निवडणुकीपूर्वी आळंद  मतदारसंघाच्या मतदार यादीतून बेकायदेशीरपणे नावे वगळल्याच्या आरोपासंबंधी एसआयटीच्या पथकाने अक्रम, अश्पाक, नदीम आणि मुश्ताक यांना अटक करून कसून चौकशी केली होती. आठवड्यापूर्वी आरोपींच्या निवासस्थानांवर छापे टाकून 7 लॅपटॉप, 15 मोबाईल जप्त केले होते.

प्रत्येक फॉर्मसाठी (मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी) डेटा सेंटर ऑपरेटरला 80 रु. दिल्याची बाब उघडकीस आल्याने पुढील तपास हाती घेण्यात आला आहे. या कृत्यासाठीच अवैधपणे कॉल सेंटर उघडण्यात आल्याची बाब आता समोर आली आहे. डिसेंबर 2022 व फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान एकूण 6,018 अर्ज सादर करण्यात आले. या बदल्यात 4.8 लाख रुपये अदा करण्यात आले, असे समजते. 2023 मध्ये आळंदचे आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बी. आर. पाटील यांनी तक्रार दाखल करण्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदविला होता. सप्टेंबर 2025 मध्ये एसआयटीकडे प्रकरण हस्तांतर करण्यात आले. मागील आठवड्यात एसआटीने आळंदचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांच्या निवासस्थानावर छापा टाकला होता.

Advertisement
Tags :

.