लवू मामलेदार खूनप्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी
न्यायालयाकडून 14 दिवसांची कोठडी
बेळगाव : फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार (वय 67) यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुभाषनगर येथील तरुणाची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. अमिरसोहेल ऊर्फ मुजाहिद शकीलसाब सनदी (वय 27) रा. दुसरा क्रॉस, सुभाषनगर असे त्याचे नाव आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाला अटक करून शनिवारी रात्री येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने 14 दिवसांसाठी अमिरसोहेलला न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर रात्री उशिरा या तरुणाला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात नेऊन सोडण्यात आले. शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी खडेबाजारमध्ये माजी आमदारांची कार
ऑटोला घासल्याचे निमित्त होऊन कारचा पाठलाग करीत श्रीनिवास लॉजसमोर अमिरसोहेलने लवू मामलेदार यांना मारहाण केली होती. मारहाणीच्या घटनेनंतर लॉजमध्ये जाताना रिसेप्शनजवळच लवू मामलेदार कोसळले. लॉज कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने कारमधून सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. यासंबंधी हॉटेलचे व्यवस्थापक अडव्याप्पा करलिंगन्नावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2003, कलम 103(1), 126(2), 152 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर लगेच पोलिसांनी अमिरसोहेलला ताब्यात घेतले होते. रात्री त्याची कसून चौकशी करून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.