For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोपीच म्हणतात एक कोटी...नोंद मात्र दहा लाख!

11:51 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरोपीच म्हणतात एक कोटी   नोंद मात्र दहा लाख
Advertisement

कित्तूर दरोड्यातील रकमेत तफावत : नेमका दरोडा कितीचा?

Advertisement

बेळगाव : एक महिन्यापूर्वी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरजवळ झालेल्या दरोडा प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणातील चौघा आरोपींना उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे अटक करण्यात आली असून गोळीबारात दोघेजण जखमी झाले आहेत. आरोपींनी दिलेल्या जबानीमुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. कित्तूरजवळ नेमका दरोडा कितीचा झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दि. 3 जुलै रोजी शास्त्राrनगर येथील अमित पेरिवाल यांनी कित्तूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार व्यवसायानिमित्त केए 17 एमए 1992 क्रमांकाच्या नेक्सा कारमधून बेळगावहून शिमोग्याला जाताना कित्तूरजवळ कार अडवून दहा लाख रुपये रोकड पळविण्यात आली आहे. कारमध्ये सुनील प्रजापत व श्रीचंद नाथ हे दोघेजण होते. त्यांचे हातपाय बांधून त्यांना धारवाडच्या हद्दीपर्यंत नेल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 30 जून रोजी सकाळी 6.30 ते 7 या वेळेत ही घटना घडली आहे.

मंगळवार दि. 30 जुलै रोजी मथुरा येथील जैंत पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील रामताल रोडवर मथुरा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीनंतर हिरानाथ ऊर्फ हिरालाल, रवी ऊर्फ रवींद्र, लक्ष्मण नाथ व राहुल या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण राजस्थान व मथुरा येथील आहेत. या प्रकरणातील आणखी दोघेजण अद्याप फरारी आहेत. मथुरा पोलिसांनी त्यांच्याजवळून 10 लाख 35 हजार रुपये रोख रक्कम, चार गावठी कट्टे, जिवंत काडतुसे व दरोड्यासाठी वापरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे. गोळीबारात हिरानाथ ऊर्फ हिरालाल, रवी ऊर्फ रवींद्र जखमी झाले असून मथुरा येथील सरकारी इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेसंबंधी मथुराचे एएसपी शैलेशकुमार पांडेय यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. आम्हाला खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. नंबरप्लेट नसलेल्या कारमधून गुन्हेगार येत असल्याची माहिती होती. त्यामुळे तपासणी करताना कारमधील गुन्हेगारांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल गोळीबारात दोघेजण जखमी झाले आहेत.

Advertisement

संशयितांनी कित्तूरजवळून 1 कोटी रुपये पळविल्याची कबुली दिली आहे. मात्र, कित्तूर पोलीस स्थानकात केवळ 10 लाख रुपयांवर डल्ला घातल्याचा एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दरोडा कितीचा झाला? एक कोटी रुपये की दहा लाख रुपये? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मथुरा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी स्वत: एक कोटी रुपये पळविल्याची कबुली दिली आहे. त्यामुळेच या प्रकरणातील गौडबंगाल वाढत चालले आहे. बेळगाव पोलिसांचे एक पथक सध्या मथुरा येथे तळ ठोकून आहे. एफआयआरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे केवळ दहा लाख रुपयांचा दरोडा झाला असेल तर या प्रकरणाचा तपासच पूर्ण झाल्यासारखे आहे. केवळ न्यायालयाची परवानगी घेऊन अटकेची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्यांच्या कारमधून रक्कम नेली आहे, त्यांनीच दहा लाख रुपये पळविल्याचे सांगत असताना गुन्हेगारांनी मात्र एक कोटीची कबुली कशी दिली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घटनेभोवती संशयाचे वलय 

उत्तर प्रदेशमधील दै. भास्कर, दै. जागरण आदी आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये यासंबंधीचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झाले आहे. आरोपींनी कारमधून एक कोटी रुपये पळविल्याचा उल्लेख पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीवरून या दैनिकांनी केला आहे. त्यामुळेच कित्तूरजवळ घडलेल्या घटनेभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. मथुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिरानाथ ऊर्फ हिरालाल हा बेळगाव येथे कामाला होता. पैसा कोठून व कसा येतो आणि कसा जातो, याचा अभ्यास करूनच त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना एकत्रित करून हा दरोडा घातला आहे. प्रत्यक्षात दरोडा दहा लाखांचा की एक कोटीचा? याचा खुलासा तपासाअंती बेळगाव पोलिसांना करावा लागणार आहे. उपलब्ध माहितीनुसार ही रक्कम दोन कोटीच्या घरात आहे.

Advertisement
Tags :

.