Sangli : सांगलीत मरीरी लक्ष्मी मंदिरातील चोरीचे आरोपी जेरबंद
सूर्यनगर लक्ष्मी मंदिरातील चोरी उघड
सांगली : मागील आठवड्यात विट्यातील सूर्यनगर येथील मरीरी लक्ष्मी मंदिरात चोरी करुन देवीच्या गळ्यातील दोन मंगळसूत्र लंपास करुन पसार झालेला आणि तडीपार असलेल्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून २ लाख २० हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्रकाश जगन्नाथ सदामते (रा. आमणापूर) असे चोरट्याचे नाव आहे.
मंदिर चोरीतील चोरटा नागाव कवठे गावाच्या हद्दीत तासगाव ते कुमठे फाटा रस्त्यावरील राधाकृष्ण हायटेक रोपवाटिका परिसरात दुचाकीवरुन फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार हणमंत लोहार आणि अभिजीत ठाणेकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळालावला असता संशयित प्रकाश सदामते यास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे ६ ग्रॅमची सोन्याची वाटी आणि सहा मींचे दोन मंगळसूत्रे मिळून आली. दागिन्यांबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आठवडयापूर्वी विटा येथील लक्ष्मी मंदिरातून देवीच्या गळ्यातील मंगळसूत्रे चोरल्याची कबुली दिली.
सदामते हा अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर पलूस, आष्टा, चिंचणी बांगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रकाश सदामते यास ऑगस्ट २०२५ साली उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव यांच्या आदेशाने सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरिक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सिकंदर वर्धन यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी केली.